बांधकाम खात्यापुढे नगरसेविका अजळकर हतबल

0

धुळे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार ठेकेदारामुळे गटारीचे सुरु असलेले काम दोन महिन्यापासून बंद पडले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटार चोकअप झाल्याने रस्त्यावरुन वाहत असून आरोग्याला बाधा निर्माण झाली आहे. अनेक तक्रारी प्रभाग क्र. 32 च्या नगरसेविका सौ. माधुरी अजळकर यांच्याकडे करण्यात आल्या. मात्र चितोडरोड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने नगरसेविका सौ. माधुरी अजळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे.

ठेकेदार जुमानेना
नगरसेविका सौ. माधुरी अजळकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार मनपा शाळा क्र. 28 (जुना चितोड नाका) ते वाघनगर पावेतो अर्थात फाशीपूल ते सुरत बायपास रस्त्यावर गटारीचे काम केले जात होते. ते काम 2 महिन्यापासून ठेकेदाराने बंद ठेवले आहे. पूर्वीची गटार चोेकअप झाली आहे. त्यामुळे गटारीचे व पावसाचे पाणी सरळ रस्त्यावर वाहते आहे. पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे, हे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सामुहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सौ. माधुरी अजळकर यांनी दिला आहे.