बांधकाम नियमित करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालये

0

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून 31 डिसेंबर 2015 पूर्वी झालेली आतील बांधकामे 10 टक्के शुल्क भरून नियमित करता येणार आहेत. ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये क्षेत्रिय कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. संबंधित तहसील कार्यालयांसह मध्यवर्ती ठिकाणे सुरू करण्यात येणार असून सध्या पीएमआरडीएकडे दररोज चार ते पाच प्रस्ताव दाखल होत असल्याची माहिती महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

पीएमआरडीच्या हद्दीमध्ये पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएमआरडीएकडे अर्ज दाखल करून बांधकामे अधिकृत करून घेता येतील. संबंधितांनी पीएमआरडीएकडे अर्ज दाखल करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होत. त्यानंतर दररोज चार ते पाच प्रस्ताव पीएमआरडीएकडे येऊ लागले आहेत. बांधकामाच्या दहा टक्के दंड आकारून ही बांधकामे नियमित करून देण्यात येणार आहेत. दंडाच्या रकमेमधून पीएमआरडीएला मिळणारा निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. बांधकामांची संख्या लक्षात घेता नागरिकांना प्रस्ताव सादर करणे अधिक सोयीस्कर व्हावे याकरिता क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. संबंधित तहसील कार्यालय आणि मध्यवर्ती ठिकाणी ही क्षेत्रीय सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अनधिकृत बांधकामे सुरळीत करण्यासाठी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. पीएमआरडीएला यामधून चांगला निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.