बारामती । बारामती नगरपालिकेत लवकरच बांधकाम परवाने हे एका क्लिकवर घरबसल्या मिळणार आहेत. विकास नियंत्रण नियमावलीनुसारच ऑनलाईन मंजुरी मिळणार असल्याने परवान्यातील भ्रष्टाचाराला आळा बसून लोकाभिमुख कारभार होणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
घर बांधायला सुरुवात करण्यापूर्वीच ‘बांधकाम परवाना’ हा मोठा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतो. नगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेणे हे काम त्रासदायकच ठरते. नगरपालिकेतील विहीत नमुन्यांच्या अर्जापासून विविध कागपत्रे, नकाशा शुल्क अर्जाला जोडावे लागते. त्यातही शासनाचे काही नवीन नियम झाल्यास, नगरपालिकेने त्या भागात विकासासाठी बदल सुचविल्यास अनेक समस्या घर बांधणार्यांना भेडसावत असत. मात्र, आता नव्याने घर बांधणार्यांना किंवा व्यावसायिक बांधकाम करणार्यांना सर्व कागदपत्रे ऑनलाईन भरावयाची आहेत. सर्व कागदपत्राचीं पडताळणी झाल्यावर नगर अभियंत्यांची ‘साईट व्हिजीट’ झाल्यानंतर किंवा बांधकाम पूर्ण झाल्यावर परवाना ऑनलाईनच मिळणार आहे. महावास्तू पोर्टलमुळे पारदर्शी व गतिमान सेवा नागरिकांना मिळतील, असा विश्वास मुख्याधिकारी कडूसकर यांनी व्यक्त केला.