जळगाव। जिल्हा परिषद अधिनियम 1961 च्या कलम 83 (5) नुसार खातेवाटप झालेल्या व्यक्तिकडे नव्याने दुसर्या खात्याची जबाबदारी देता येत नाही. असे असतांना जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी नियमबाह्यरित्या महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्याकडे बांधकाम समितीचेही सभापतीपद दिले. या निवडीला आव्हान देत भाजपाच्या भुसावळ तालुक्यातील कुर्हासिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी समिती बरखास्त करण्याची मागणी केली.
याबाबत आयुक्त कार्यालयात सोमवार 17 रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. आयुक्तांनी प्रशासन, सभापती, अध्यक्ष, तक्रारदार यांचे म्हणणे एैकुन घेत निर्णय झेडपीवर सोपविला आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय देण्याचे सांगितले आहे. सीईओंकडे तक्रार केली असता सीईओंनी याबाबत आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविले होते. निवड समिती सचिवांनी खातेवाटप नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे प्रशासन नियबाह्य कसे आहे हे पटवून देईल तसेच अध्यक्षा, सभापती यांच्या वकीलांनी मांडलेल्या बाजुंचा अभ्यास करुन जिल्हा परिषद याबाबत तीन दिवसात निर्णय देईल असे अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले. प्रशासनातर्फे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर उपस्थित होते. तक्रारदार आणि बचाव पक्षातर्फे वकीलांनी बाजु मांडली.