भुसावळ। आपल्या दैनदिन जेवणात प्रामुख्याने कांद्या प्रमाणेच लसणाची देखील आवश्यकता असते. हे लक्षात घेवून महिलांची वाळवण तयार करण्याची लगबग सुरु होते. उन्हाळ्यात बहुतांशी नागरिक वाळवणासह कांदा, लसुण, मिरची, मसाला, डाळी, गहू, तांदूळ व धान्य खरेदी करून साठवण करून ठेवतात. या पार्श्वभूमीवर शहरातील जामनेर रोड वर लसूण विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहे. ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल विक्रीस घेवून येत आहे.
40 ते 70 रुपयांपर्यंत आहेत दर
यंदा लसणाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे किंमतीत घट झाल्याचे ि दसून येते. हा लसूण खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. उन्हाळ्यामुळे पुढील चार महिन्यात लसूणाच्या किमतीत अमुलाग्र बदल होत असतो. अनेक वेळा लसुन मिळत सुद्धा नाही म्हणून लोक ओला लसूण खरेदी करून ठेवतात. म्हणून या लसणाची मागणी वाढली आहे. विविध प्रकारचा लसूण यामध्ये पातीचा, कांडी, पाकळ्या या प्रकारचा लसूण सुमारे 40 रुपयांपासून ते 70 रुपये पर्यंत विक्रीस उपलब्ध आहे.
10 किलोला 200 ते 600 रुपये दर
नवीन हंगाम सुरु झाला असल्याने मागील काही दिवसांपासून येथील बाजारात लसूणाची आवक वाढत चालली आहे. परिणामी मागणी कमी आणि आवक अधिक असे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात मध्य प्रदेशातून आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रति 10 किलोला 200 ते 600 रुपये दर मिळाला.
लागवड क्षेत्रात वाढ
आवक वाढत असल्याने दरात घट होत आहे. दर आणखी घटणार की काय या भीतीपोटी लसूण उत्पादक शेतकरी ओला लसूण विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात लसूण लागवडीच्या क्षेत्रात 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेही बाजारातील आवक वाढली आहे. विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेला लसूण ओला असल्याने लसूणाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. ओल्या लसणाचे वजन अधिक भरत असले, तरी जोपर्यंत बाजारात सुकलेला लसूण दाखल होत नाही. तोपर्यंत निर्यात सुरू होणार नसल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. बाजारात एकीकडे दर कमी मिळत आहे. तर दुसरीकडे माल पडून राहिल्यास गोणीचे वजन घटत आहे. असा दुहेरी तोटा शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.