बाजारासाठी उभारली जाणार अत्याधुनिक शेड

0

ग्रामपंचायतीकडून 72 लाख मंजूर

वाघोली : वाघोलीतील रोजच्या बाजासाठी व्यापारी, शेतकरी व ग्राहकांना ऊन, पाऊस यांपासून संरक्षण मिळावे आणि शेतीचा माल खराब होऊ नये यासाठी वाघोली ग्रामपंचायत निधीमधून अत्याधुनिक शेड बांधण्यात येणार आहे.

वाघोली येथे परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये सकाळी व सायंकाळी शेतकरी शेतातील भाजीपाला व अन्य माल विक्रीसाठी आणतात. दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे रोजचा भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. विक्रेत्यांना सद्यस्थितीत तात्पुरते शेड उभारून देण्यात आले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात या शेडचा फारसा उपयोग होत नसल्यामुळे बर्‍याचवेळा व्यापारी व शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान होते. व्यापारी, शेतकरी यांचा माल खराब होऊ नये आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतकडून अत्याधुनिक शेडसाठी 72 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी या कामाचे भूमिपूजनही झाले आहे.

रोजच्या बाजारासाठी निधी मंजूर करून अत्याधुनिक शेडची उभारणी केली जात आहे. ग्रामपंचायतीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य ओबीसी विभागीय प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी स्पष्ट केले.