रावेर । गेल्या आठवड्यापासून येथील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढती आहे. एप्रिल महिन्यात दोन सुटीचे दिवस वगळता तब्बल दीड हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. तालुक्यात केळीबागा कापणीनंतर रब्बी हंगामात गव्हाची पेरणी होते. त्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचे क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यात यंदा साडेचार हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. थंडीचे योग्य प्रमाण, रोगराईचा अभाव असल्याने बंपर उत्पादन येईल, अशी अपेक्षा होता. मात्र, हेक्टरी 40 ते 42 क्विंटल उत्पादन हाती आल्याने ही अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र आले.
1300 ते 1700 रुपयांपर्यत भाव
दरम्यान, कापणी-मळणीनंतर तयार केलेला गहू शेतकरी बाजार समितीमध्ये विकायला आणत आहेत. यामुळे खरीप हंगामानंतर 1 एप्रिलपासून बाजार समितीमधील वर्दळ पुन्हा वाढली आहे. 1 एप्रिल रोजी समितीमध्ये 350 क्विंटल, 3 एप्रिलला 375, तर 5 एप्रिलला 400 आणि 6 ला 300 अशी एकूण दीड हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. या गव्हाला 1300 ते 1700 रुपयांपर्यत भाव मिळत आहे.
साडेचार हजार हेक्टर्सवर पेरणी
दरम्यान, यंदा तालुक्यात गव्हाचे उत्पादन घटले असले तरी हाती आलेल्या गव्हाची गुणवत्ता मात्र उत्कृष्ठ असल्याचे आडते अशोक वाणी यांनी सांगितले. तर गव्हाचा उतारा कमी आल्याने हरभरा तुरीमुळे शेतकर्यांना बर्यापैकी फायदा होत आहे. यंदा रावेर तालुक्यात गव्हाची 11 हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. मात्र, हे क्षेत्र निम्म्यापेक्षा जास्तीने घटून केवळ साडेचार हजार हेक्टरवर पेरणी झाली. यामुळे अपेक्षित उत्पादन आले तरी गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून येत आहे.