बाणेरवासीयांची पाण्यासाठी वणवण कायम

0

टाकीसाठी जागा मिळत नसल्याने समान पाण्यासाठी आणखी प्रतिक्षा

पुणे :- बाणेर-बालेवाडीमधील नागरिकांची समान पाण्यासाठीची वणवण मात्र कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. शहराला चोवीस तास आणि समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने तब्बल 2 हजार 300 कोटींची योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात 183 पाण्याच्या टाक्यांचे काम वेगाने सुरू असले, तरी बालेवाडीतील 10 लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीसाठी महापालिकेस जागाच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

न्यायालयात याचिका
शहरातील इतर ठिकाणी पाणी टाक्यांचे काम वेगाने सुरू असले, तरी बालेवाडीत टाकीसाठी अजूनही जागाच शोधली जात आहे. विशेष बाब म्हणजे, याच भागातील विद्यमान नगरसेवकांनी या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही, म्हणून थेट न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आयुक्तांनी टाकीचे काम थांबविले
समान पाणी योजनेंतर्गत पालिकेकडून बालेवाडी जकात नाका आवारात टाकी उभारण्याचे कामही सुरू केले होते. मात्र, ही टाकी उभारल्यास त्यामुळे या जागेवर स्मार्ट सिटीच्या ट्रान्सपोर्ट हबची शोभा जाईल, असा गवगवा करत त्यावेळी स्मार्ट सीटी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीच या टाकीचे काम थांबविले. तसेच दुसरी जागा शोधण्याचे आदेश दिले.

नगरसेवकाचा विरोध
प्रशासनाने या भागात एक अ‍ॅमेनिटी स्पेसची जागा शोधली आणि तेथे टाकी प्रस्तावित केली. मात्र, या भागातील एका भाजप सदस्यानेच त्या जागेस विरोध केला आहे. या जागेवर आपल्याला उद्यान करायचे असून ही जागा टाकीसाठी देण्यास नकार दर्शविला आहे. तर प्रशासनानेही या सदस्यांच्या हट्टापायी पुन्हा टाकीची जागा शोधण्यास सुरूवात केली असून अजून जागा मिळालेली नाही. त्यामुळे या टाकीचे कामही सुरू झालेले नाही.

1 कोटींचा खर्च वाया
तर बालेवाडीतील टाकीचे काम अर्धवटच सोडण्यात आले आहे. यासाठी महापालिकेचे आधीच 36 लाखांचे नुकसान झालेले आहे. त्यानंतर आता दीड वर्षापासून हे काम रखडल्याने टाकीच्या खर्चात 10 टक्के वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. या टाकीसाठी 8 कोटींचा खर्च असून त्यातही आता 70 ते 80 लाखांची वाढ होणार आहे. तर आधीचा 36 लाखांचा खर्च असा एकूण 1 कोटींचा खर्च वाया घालवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.