बापट समर्थक नाराज की अलिप्त

0

पुणे : भाजपत अलिकडे घडलेल्या घडामोडींमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे पक्षातही मरगळ आली आहे.

पक्षांमध्ये ही नाराजीची भावना महापालिका निवडणूक काळातही होती. परंतु निवडणुकीतील यश-अपयश याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने बापट यांच्यावर असल्याने नाराजीचे पडसाद तेव्हा उमटले नाहीत. स्वीकृत नगरसेवक निवडीत बापट यांच्या शिफारशी डावलल्याने त्यांच्या समर्थकांना पहिलाच धक्का बसला. बापट यांनी गणेश घोष यांचे नाव सुचविले होते, त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी गणेश बिडकर यांना उमेदवारी दिली. बिडकर आणि बापट यांचे संबंध बराचकाळ बिघडलेले राहिले आहेत. त्यातच बिडकर यांचे राजकीय पुनर्वसन झालेले बापट समर्थकांना रुचलेले नाही.

पुण्यात कचरासमस्या उग्र असताना बापट आणि महापौर मुक्ता टिळक हे परदेश दौर्‍यावर गेले. त्याचे मुबलक भांडवल राष्ट्रवादी काँग्रेसने केले. अखेरीस खासदार संजय काकडे यांच्याकडील विवाहानिमित्त पुण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना कचरासमस्या सोडविण्यासाठी बैठक घ्यावी लागली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत प्रश्‍न सुटला असे चित्र निर्माण झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसने बापट यांच्याविरोधात फलकबाजी केली. ‘बापट तुम्ही परत या! तुमच्यावर कोणी रागावणार नाही,’ अशी टवाळी उडवणारी भाषा होती. याकाळात पक्षातील अन्य नेत्यांनी बापट यांची पाठराखण केली नाही; याबद्दल बापट समर्थकांमध्ये नाराजी आहे. यापुढे मुख्यमंत्रीच निर्णय घेणार आहेत; अशी कडवट प्रतिक्रिया बापट समर्थकांमध्ये आहे. पीएमपी संचालकपदावर खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांची वर्णी लागली. त्यातच पक्षातील काकडे यांचा गट आकाराला येऊ लागला आहे. या पक्षातील ताणतणावात बापट समर्थकांनीही अलिप्त राहण्याचे ठरविले आहे.