औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणूक कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरला त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. परिणामी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी साधना पांडे यांना तडकाफडकी निलंबित केले.
मतदान करू देऊ नका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिसभेच्या बैठकीला सुरुवात होताच कुलसचिव डॉ.साधना पांडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे महाराज असा उल्लेख केला. महाराज शब्दावर प्रा.सुनिल मगरे यांनी आक्षेप घेत बाबासाहेबांना देव, राजा बनविण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. याची सुरुवात बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातून होत असल्यामुळे असा उल्लेख करणाऱ्या कुलसचिवांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर प्रचंड गदारोळ झाला. शेवटी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी डॉ. पांडे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा करत त्यांना सभागृहाबाहेर काढले.
मात्र, विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी डॉ. पांडे यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी लावून धरली. तेव्हा ती मान्य झाल्यामुळे डॉ. पांडे यांनी मतदानही केले. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे महाराज हा शब्द वापरल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.