बारामती । बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावच्या सरपंच सुजाता गायकवाड यांच्याविरूध्द अविश्वासाचा ठराव दाखल झाला आहे. आठ विरूध्द सहा अशा फरकाने हा ठराव दाखल झाला आहे. मात्र या घटनेची माहिती ग्रामसेविका इनामदार या लपवित असून याबाबतची कोणतीही माहिती बाहेर द्यायची नाही. असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे तहसीलदार हनुमंत पाटील हे सदर घटनेची माहिती ग्रामसेविकाच देतील, असे उत्तर देत आहेत. यामुळे सर्वच संभ्रमात आहेत.
बाबुर्डीच्या सदस्य अंजना अंकुश लडकत यांनी या आगोदरच राजीनामा दिला आहे. सरपंच गायकवाड यांना काम करू द्यायचेच नाही. असा एका गटाचा आग्रह असून यात ग्रामसेविकेचा सहभाग आहे की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या संंपूर्ण अविश्वास ठरावाची माहिती अतिशय गोपनीय ठेवली आहे. या सार्या गोष्टी संशयास्पद वाटाव्या अशा आहेत. गावाचा विकास करण्याऐवजी प्रशासनच राजकारण करते की काय? अशी परिस्थिती उद्भवल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. या सर्व परिस्थितीवरून गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत. येत्या 7 फेब्रुवारीला तहसिल कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली आहे.