भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या 22 वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक अत्याचार (गँगरेप) घटना नुकतीच समोर आली होती. फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होवून तो लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आल्यानंतर सोमवारी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पीडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर रविवारी सायंकाळी लोहमार्गचे पोलिस उपअधीक्षक विलास नारनवर यांनी पीडीतेची भेट घेवून घटनेची माहिती जाणून घेतली.
पीडीता बदलतेय वारंवार जवाब
आईसह भावाशी वाद झाल्याने बामणोद येथील 22 वर्षीय महिला संतापाच्या भरात भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन संशयीतांनी विवाहितेच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिचे अपहरण करीत तिच्यावर सलग चार दिवस अत्याचार करीत तिला पुन्हा रेल्वे स्थानकावर सोडल्याची तक्रार महिलेने केली होती मात्र पीडीता सांगत असलेल्या घटनेत तब्बल चार वेळा विसंगती आढळली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिली. ते म्हणाले की, पीडीतेने तब्बल चार अधिकार्यांसमोर वेगवेगळे जवाब दिले आहेत. घटनेच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून अद्याप त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सोमवारी पीडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यानंतर या घटनेबाबत अधिक काही सांगता येईल, असेही गढरी म्हणाले.