पुणे । महापालिका कर्मचार्यांसाठी आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. मात्र, याची नोंदणी करण्याकडे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ज्या अधिकार्यांच्या विभागात, तसेच ज्या कर्मचार्यांनी ही बायोमेट्रिक नोंदणी केलेली नाही. त्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविले जाण्याची शक्यता आहे. हे वेतन का थांबविण्यात येऊ नये, अशी नोटीस सामान्य प्रशासन विभागाने नोंदणी न करणार्या विभागांना बजाविली आहे.
आठ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख अनिल मुळे यांनी हे आदेश दिले आहेत. केंद्रशासनाच्या धर्तीवर महापालिकेडून कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी आधारकार्डशी जोडण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमून नोव्हेंबर 2017 अखेरपर्यंत सर्व कर्मचार्यांच्या नोंदी पूर्ण करण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले होते. मात्र, काही मोजक्याच विभागांनी ही नोंदणी पूर्ण केल्याने महापालिकेस ही हजेरी यंत्रणा अजून सुरू करता आलेली नाही.
आयुक्त नाराज
काही विभाग प्रमुखांनी नोडल ऑफिसर नेमल्याची माहिती अद्याप कर्मचार्यांना दिलेलीही नाही. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्तांनीच नाराजी व्यक्त केली आहे. या नोंदणीकडे दुर्लक्ष करणार्या विभाग प्रमुखांच्या दिरंगाईचा फटका त्या विभागातील कर्मचार्यांना बसणार असून नोंदणी का झाली नाही, याचा खुलासा करण्याचे आदेश या विभाग प्रमुखांना देण्यात आले आहे. ज्यांच्याकडून खुलासे केले जाणार नाहीत त्या विभागातील कर्मचार्यांचे वेतन थांबविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.