बायोमेट्रीक पध्दतीमुळे धान्य चोरीला आळा

0

मुंबई । राज्यातील रेशनिंग धान्य वाटप पध्दतीत अत्याधुनिक बायोमेट्रीक सिस्टीम आणल्यामुळे धान्य चोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसत आहे. यापूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमधून रेशनिंग धान्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. त्या ठिकाणाहून आता रेशनिंगचे धान्य कमी प्रमाणात मागवण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काही निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.

यापूर्वी मुंबईत रेशनिंगवरील धान्य वाटपासाठी सरासरी 54 ते 55 हजार टन धान्य रेशन दुकानदारांकडून घेण्यात येत होते. तर पुणे जिल्ह्यात सरासरी 10 हजार टन धान्य रेशन दुकानदारांकडून घेण्यात येत होते. मात्र बायोमेट्रीक कार्यप्रणाली सुरू केल्यापासून मुंबईतून 54 ते 55 हजार टन धान्याची मागणी थेट 48 ते 49 हजार टनापर्यंत खाली आलेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील 10 हजार टनाची मागणी 10 हजारावरून 6 हजार टनापर्यंत खाली घसरली आहे. याच अनुषंगाने राज्यातील इतर जिल्ह्यातील रेशनिंग धान्याच्या मागणीत घट झाल्याने रेशनिंगवरील धान्य चोरीला काही प्रमाणात तरी आळा बसायला सुरूवात झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

धान्य चोरांची साखळी तोडणार
रेशनिंगवरील धान्याची चोरी गेल्या 25 वर्षापासून करण्यात येत आहे. ही चोरी व्यापारी, दुकानदार आणि वाहतूकदार यांच्या संगनमताने होत आहे. तशी साखळीच त्यांच्याकडून चालवली जात आहे. ही साखळी तोडण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच रेशनिंगचा माल खरेदी करणार्‍याकडे आणि राज्य सरकारला माल विकणार्‍या व्यापार्‍यांकडून त्याच्या खरेदी-विक्रीच्या पावत्याही तपासण्याचे काम हाती घेण्यात येणार असून आणखी काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यास पूर्णपणे आळा घालण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, राज्यातील रेशन दुकानदारांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना मिळणार्‍या कमिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील आरे स्टॉलच्या धर्तीवर रेशनिंग दुकानामध्ये पालेभाज्यांसह इतर गोष्टी विकण्याचे परवाने देण्याचा प्रस्ताव विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यास लवकरच मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.