पिंपरी: राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेली लोकसभा निवडणुकीची लढत म्हणजे मावळ मतदारसंघातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांची. आज मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करून आल्यानंतर नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या मुख्य गेट समोर शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना विरोधी उमेदवार पार्थ अजित पवार यांनी स्वतः बारणे यांची भेट घेत हस्तांदोलन केले. यावेळी दोघांनी एकमेंकाना ऑल दी बेस्ट म्हणत शुभेच्छा दिल्या. तसेच पार्थ यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना देखील हस्तांदोलन केले.
काही दिवसांपूर्वी देहू येथे तुकारामबीज निमित्त पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे एकत्र आल्याचे दिसले होते. त्यावेळी बारणे यांनी स्वतःपार्थ पवार यांच्याशी बातचीत करत हस्तांदोलन केले होते.