बारामती (वसंत घुले) :- बारामती नगरपालिका ठेकेदारांच्या हितासाठी सदैव तत्पर असते. ठेकेदार हित हे नगरपालिकेचे ब्रीदवाक्य झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत एक महत्त्वाची घटना येथे विषद करण्याची गरज आहे.तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक या साडेचार किमीच्या अंतराचे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. याच्यातला दुसरा टप्पा होईल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचे कारण सध्या रस्त्याचे जे काम झाले आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. केवळ रस्त्यावर पडलेल्या कचमुळे गेल्या सहा दिवसांत सात अपघात घडले आहेत. याबाबत सोशल मीडियामध्ये चांगलाच आवाज उठवला जात आहे. तरीसुद्धा नगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार सुस्त आहेत.
एवढेच नव्हे तर तालुक्याचे आमदार अजित पवार यांना नागरिकांनी समाजमाध्यमातून याबाबत विनंती करून यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तरीसुद्धा संबंधित यंत्रणांना काहीही वाटत नाही. म्हणजेच नागरिकांच्या त्रासाविषयी आम्हाला काही देणे-घेणे नाही असाच याचा अर्थ होतो.याच साडेचार किमी रस्त्यावर आणखी एक धक्कादायक बाब दिसून आली आहे. ती म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पाण्याचा निचरा होणारे स्त्रोत ठेकेदारांनी तसेच नागरीकांनी राडारोडा टाकून बंद केलेले आहे. या दोन्ही रस्त्याच्या बाजूला सर्विस रोड आहे. या सर्विस रोडचेही बरेचसे स्त्रोत राडारोडा टाकून बंद झालेले आहेत. येणार्या पावसाळ्यात पावसामध्ये काय परिस्थती होईल व या परिस्थितीत नागरिकांचे काय हाल होतील; याचा कोणताही विचार संबंधित यंत्रणांनी केलेला दिसत नाही. अवघ्या वीस-बावीस दिवसांवर येऊन ठेपलेला पावसाळा तरीही याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला फोर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकलेला आहे. हा राडारोडा म्हणजे सिमेंटचे तोडलेले बांधकाम, ठेकेदाराने टाकलेली कच तसेच सम्यकशेजारी नगरपालिकेने तीनवेळा खोदलेले काम व त्यातून निर्माण झालेला राडारोडा हा सकृतदर्शनी दिसत असला तरी याकडे नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. या साडेचार किमीच्या अंतराच्या रस्त्याच्या बाजूला कच मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे या ठिकाणच्या पाणी निचर्याल्याही अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावर साठले जाणार आहे. व त्यामुळे रस्ता लगेचच खराब होण्याची चिन्हे आहेत. ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या समोरच रस्त्याच्या पलिकडील बाजूस एक तुडूंब नालाच तयार होतो. तशीच परिस्थिती या साडेचार किमी अंतराच्या रस्त्यावर जागोजागी होईल असे चित्र आहे. या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे याच ठेकेदाराकडून यापूर्वीही सर्विस रोडचे काम दिले गेले होेते त्यावेळीही या रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत होते. तरीसुद्धा या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या कामाचा दर्जा हा प्रामाणित नाही असे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे अपयश नक्की कोणाचे हे शोधण्याची गरज आहे.
याबाबत सातत्याने लिहिले गेले आहे; परंतु नगरपालिकेच्यादृष्टीने इतर रस्त्याची दुर्दशा झाली असताना याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सातत्याने खर्च केला जातो व तसेच देखभालही केली जाते म्हणजेच हा रस्ता लाडका रस्ता म्हणून नागरीक चर्चा करीत असतात. या रस्त्यावरील झाडांसाठीसुद्धा खासपद्धतीने देखभाल केली जाते. स्वच्छता केली जाते मात्र त्याचवेळी कसबा भागात जाणार्या दोन्ही पुलांची अतिशय दयनीय अवस्था आहे. मोठाले खड्डे चुकविताना चारचाकी दुचाकी वाहनांना काय त्रास होतो हे एकदा संबंधित यंत्रणांनी तपासून पाहिलेच पाहिजे. म्हणूनच बारामतीचा सर्वांगीण विकास हा असमतोलपद्धतीने केला जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.