बारामतीच्या बोगस ग्रामपंचायतीचा आता जनता दरबारी पंचनामा!

0

मुंबई – बारामती तालुक्यातील बारामती ग्रामीण ही त्रिशंकू विभागातील अद़ृश्य ग्रामपंचायतीचा बोगस कारभार जनशक्तिने समोर आणला होता. 28 वर्षे सलग कागदावरच सुरू असून ग्रामपंचायतीला सरपंच नव्हते. या ग्रामपंचायतीला मतदान झाले नाही, तिची कधी ग्रामसभा झाली नाही. अशा या भारतातील एकमेव बोगस ग्रामपंचायतीचे वृत्त दैनिक जनशक्तिमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे; तर राज्यात खळबळ उडाली होती. अस्तित्वात नसलेल्या बारामती ग्रामीण ग्रामपंचायतीच्या नावाखाली कोट्यावधीचा निधी लाटल्याचे प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी उजेडात आणले होते. वारंवार मागणी करुनही अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने धवडे यांनी जनतेच्या दरबारात प्रकरणाचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोगस ग्रामपंचायतीचे हे प्रकरण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सांगणार असल्याची माहिती पोपट धवडे यांनी जनशक्तिशी बोलताना दिली आहे. पहिल्या टप्प्यात धावडे बीड, परभणी, औरंगाबाद, धुळे या चार जिल्ह्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. बारामती शहरालगत असलेल्या त्रिशंकू भागात ही बोगस ग्रामपंचायत दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायत अस्तिवात नाही. ग्रामपंचायतीला ना सरपंच आहे, ना सदस्य. केवळ ग्रामसेवक या ग्रामपंचायतीचे कामकाज चालवतात. ग्रामपंचायतीचे स्वत:चे लेटर हेड, शिक्के आहेत. १९८५ पासून ग्रामपंचायतीला पाच ग्रामसेवक होते. एक ग्रामसेवकाने तब्बल १७ वर्षे कामकाज पाहिले.

अधिवेशनात गाजला होता मुद्दा
१९८५ ते २०१२ या कालखंडादरम्यान निधी लाटल्याचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी २०१० पासून चौकशीचा फार्स सुरु आहे. पण, यावर अद्यापपर्यंत कारवाई झाली नसल्याचा, आरोप धावडे यांनी केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पंचायतराज समितीने याप्रकरणाची चौकशी केली होती. पाच सदस्यांच्या समितीने बारामतीमध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी केली आणि अहवाल देखील दिला होता. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चिला गेला होता. तसेच अहवाल देखील सभागृहात मांडण्यात आला होता.