बारामती । बारामतीतील फूटपाथ, पार्कींगच्या जागांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिका प्रशासन व अतिक्रमण विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरातील सर्व चौक, फूटपाथ, पार्कींगच्या जागांवर अवैध व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. पोलिस आणि नगरपालिका प्रशासन याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहताना दिसत आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. दुचाकीस्वारांना गाड्या कुठेे पार्क करायची चिंता दररोज सतावते. शहरातील रस्ते छोटे असून या छोट्या रस्त्यांवर अतिक्रमणे झालेली असून नागरीकांना चालणेसुध्दा मुश्किल झाले आहे. त्यामुळे दररोजच वादाचे प्रसंग उद्भवताना दिसतात. याबाबत अधिकार्यांशी संपर्क साधला असता नगरपालिका प्रशासनाने फेरीवाला धोरण राबविलेच नाही. त्यामुळे कोणी कोठेही आपापल्या टपर्या टाकताना दिसत आहे, असे सांगितले. तर दुसरीकडे पार्कींगच्या जागा गिळंकृत झालेल्या दिसताहेत. विशेष बाब म्हणजे बारामती नगरपालिकेच्या आसपासच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असूनसुध्दा नगरपालिका प्रशासन कोणत्याही स्वरुपाची कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण वाढल्याचे दिसत आहे.
दंडात्मक कारवाईची मागणी
शहरातील चौक आणि फुटपाथ मोकळा श्वास केव्हा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका प्रशासन यंत्रणा व पोलिस यंत्रणा यांनी संयुक्तपणे अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र स्वरुपात राबवून दंडात्मक कारवाई करावी. तसेच ही कारवाई कडक व्हावी आणि या कारवाईत सातत्य हवे, अशी स्पष्ट मागणीच नागरीक करताना दिसत आहेत. मात्र, दोन्ही प्रशासने नागरीकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.