बारामतीत खरीपाचा हंगाम जोमात

0

बारामती । बारामती तालुक्यात पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली आहे. जिरायती भागात खरीप पिकांचा बहर यंदा जोरात आहे. विशेषत: जिरायती भागात पुढच्या दिड वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे. जिरायती भागातील बाजरीचे पिक हातात आले असून एकरी सरासरी आठ ते बारा पोती बाजरीचे उत्पन्न निघत आहे. यावर्षीचे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित चांगले राहणार असून हातात चार पैसे राहणार आहेत.

बारामती तालुक्यात खरीपापेक्षा रब्बीचे पिक शेतकर्‍यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. बारामतीतील कृषी खात्याने खरीपाचे पीक वाया गेल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र खरीपाचे पीक जोमदार आले आहे. खरीपाच्या पिकात बाजरी व मका या मुख्य पिकांचा समावेश होतो. उंडवडी क. प., सोनवडी सुपे, या दोन तीन गावांचा अपवाद सोडला तर बाकीच्या 38 गावात खूपच चांगली परिस्थिती आहे. कृषी विभागाने साडेआठ हजार हेक्टरवरील पेरणी वाया गेल्याचे कोणत्या आधारावर सांगितले याविषयी शेतकर्‍यांमध्ये संभ्रम तयार झाला. फक्त चार गावातील परिस्थिती पावसाअभावी खराब होती इतरत्र खरीपाचे पिक खूप चांगले असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय कृषि अधिकारी ताटे यांनी सांगितले.

ओेढे, विहीरी ओव्हर फ्लो
तालुक्यात 1 ते 16 जून या कालावधीत सरासरी 174 मिलीमीटर पाऊस पडला होता. याच पावसाने खरीपाला आधार दिला. याच पावसावर खरीपाचे पिक जोमदार आले आहे. गत आठवड्यात म्हणजेच शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने नाले, ओेढे, विहीरी, शेततळी ही तुडुंब भरले आहेत. मोरगावजवळील तरडोली येथील तलाव 60 टक्के भरला आहे. गेल्या चार वर्षात हा तलाव कोरडाच होता. तर गेल्या सात वर्षानंतर कर्‍हा नदीला पूर आला होता. कर्‍हा नदीवरील बंधारे तुडुंब भरलेले आहेत. या पावसाने शेतकर्‍यांचे थोडेफार नुकसान केले असले तरी शेतकर्‍यांमध्ये खूप समाधान आहे.

सरासरी पडलेला पाऊस
बारामती तालुक्यातील पावसाची आकडेवारी पाहिली तर जिरायती आणि बागायती भाग हा यंदाच्या वर्षी संपन्न स्थितीत आहे. शुक्रवारचा पाऊस कंसात दिला असून 1 जून 2017 पासून पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे बारामती – 135 (461), लोणीभापकर – 117 (461), लाटे – 74 (242), बर्‍हाणपूर – 61 (376), सोमेश्‍वर – 63 (186.4), पणदरे – 74 (369), जळगाव कडेपठार – 45 (406), मोरगाव – 66 (261), वडगाव निंबाळकर – 64 (262), आटफाटा होळ – 125 (298), उंडवडी कडेपठार – 41 (109), माळेगाव कॉलनी 46.5 (198), मानाजीनगर – 91 (322), चांदगुडेवाडी – 45 (448), काटेवाडी – 36 (361), सोनगाव – 142 (480), के व्ही के – 84.6 (397), कटफळ – 38 (260),

कृषी विभागाचा दुबार पेरणीचा दावा अयोग्य
लोणीभापकर परिसरातील सायंबाचीवाडी, मासाळवाडी, पळशी, माळवाडी, कान्हाडवाडी, मोराळवाडी, मुर्टी, मोढवे, मुढाळे, मोरगाव, तरडोली या जिरायती भागातील पट्ट्यात खूप चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा पट्टा तीव्र दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागाला प्रत्यक्ष भेट दिली असता मका आणि बाजरी ही दोन पिके अत्यंत जोमदार आहेत. बाजरीची काढणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे. कुठेही दुबार पेरणी कारावी लागली नाही. हे येथील शेतकर्‍यांनी बोलताना सांगितले. सुपा या भागातील काळखैरेवाडी, उंडवडी कडेपठार, चांदगुडेवाडी, सोनवडी सुपे या भागात जुनच्या पहिल्या आठवड्यातील पाऊस हा कमी प्रमाणात होता. मात्र खरीपाच्या पिकांना कमी पाणी लागते. त्या अर्थाने पाहिला पाऊस बर्‍यापैकी होता. त्यामुळे येथेही पिके चांगली आली आहेत. दुबारा पेरणीचे संकट टळले यामुळे कृषी विभागाचा दुबार पेरणीचा दावा हा योग्य वाटत नाही हे स्पष्ट होते.

पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटवा
या भागास भेट दिली असता, आमच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न या सरकारने तरी कायमचा मिटवावा, अशी मागणी शेतकरी करीत होते. या भागातील लोकांना मजुरीसाठी स्थलांतर करावे लागते. ही दुर्दैवाची बाब आहे. बारामती जिरायती भागाबद्दल सातत्याने बोलले, लिहिले जाते मात्र कृती होत नाही. अशी भावना या भागातील तरुणांनी व्यक्त केली आहे. या भागावर सातत्याने सर्वच राज्यकर्त्यांकडून अन्याय झाला आहे हे वास्तव मान्य करावे लागते.