बारामती । बारामती तालुक्यातील दुसर्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांत सोळा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. डिसेंबरच्या मध्यावधीत या निवडणूका होत असून याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे. या दुसर्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावाचा समावेश असून पारवडी, डोर्लेवाडी, अंबी बुद्रुक, गुणवडी या मोठ्या गावांचा समावेश आहे.
दुसर्या टप्प्यात चांगलीच धडक
मानाप्पाचीवाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, सायंबाचीवाडी, अंबी बुद्रुक, गुणवडी, कर्हावागज, करंजेपूल, गाडीखेल, चौधरवाडी या गावांचा समावेश आहे. 17 जानेवारी 2018 रोजी यातल्या बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपत आली आहे. त्यामुळे या दुसर्या मोठ्या टप्प्यात चांगलीच धडक होणार आहे. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड असली तरी बर्याच ठिकाणी त्यांना झुंझावे लागणार आहे. बारामती तालुक्यात भाजपा व शिवसेना असून नसल्यासारखेच आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे पदाधिकारी कधीही आत्मविश्वासपूर्वक रस घेत नाहीत. त्याचा फटका गावपातळीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बसतो आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा अनुभव लक्षात येता दुसर्या टप्प्यातही भाजपा काही शिकणार नाही अशीच लक्षणे दिसत आहेत.
काटेवाटीची निवडणूक रंगणार
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काटेवाडीवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. काटेवाडीची निवडणूक चांगलीच चर्चीली जाणार आहे. काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच विरोध जाणवत आहे. विरोधकांनी तगडी तयारी केली असून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या पध्दती अवलंबणार आहेत. बारामती तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात लढत होणार आहे. पारवडी गावात नुरा कुस्ती होण्याची शक्यता पारवडीकरांनी व्यक्त केली आहे. नावाला विराधी पॅनल करणे एवढीच भूमिका राहील. असेही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने व पळवाट म्हणून हा गावचा मामला आहे म्हणून नुरा कुस्ती होण्याची शक्यता आहे. गावतल्या गाव पुढार्यांनी पॅनल बांधण्याची तयारी सुरू केली आहे. सरपंच पदावर एकमत होण्यासाठी मात्र बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीत पैशाचा चांगलाच वापर होईल असेही बोलले जात आहे. सरपंचपद हे जनतेतून निवडून द्यायचे असल्याकारणाने कसोटी राहणार आहे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकांना राजकीय पक्षाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच महत्त्व देत आहे मात्र भाजप आणि शिवसेना याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. भारतीय जनता पार्टी हा देशातील राष्ट्रीय पक्ष असूनसुध्दा बारामती तालुक्यात गाव पातळीवर पक्ष बांधणीसाठी पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
विरोधक यावेळी सावध
दुसर्या टप्प्यातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्रामपंचायतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच टक्कर द्यावी लागणार आहे. काटेवाडी गावातील विरोधक हे तडजोड करणार नसून निर्धारपूर्वक एकत्र येऊन चांगलीच झुंज देणार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूकीवरून ग्रामपंचात निवडणूकीत पैशाचा अक्षरश: पैशाचा धूर निघाला होता. बारामती, इंदापूर रोडनजीकच्या एका घरातून पैशाचे वाटप होत होते हे अनेकांनी जवळून अवलंबिले आहे. त्यामुळे विरोधक यावेळी सावध असून पैसे वाटपावर चांगल्याच प्रकारे लक्ष ठेवणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत अधिकारी तटस्थ भूमिका घेत असून हा सत्तेच्या बदलाचा परिणाम असल्याचे काटेवाडीतील नागरिकांनी सांगितले.