बारामती । बारामतीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने थैमान घातले आहे. रुग्णालयांमध्ये जवळपास 80 टक्के रुग्ण डेंग्यूचे आहेत. यावर उपाययोजना आखण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका रुग्णासाठी सर्वसाधारणपणे 10 ते 15 हजार रुपये खर्च होत आहेत. प्रपंचातील खूप मोठी रक्कम औषधोपचारासाठी वापरली जात असल्याने घराचे बजेट कोसळले आहे.
यंदा भरपूर पाऊस झाल्याने जागोजागी पाणी साचले होते. तसेच गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोकळ्या भुखंडात गवताची चांगलीच वाढ झाली आहे. पर्यायाने डासांची उत्पत्तीस्थाने वाढली. परिणामी डेंग्यूची साथ सर्वत्र पसरली आहे. बारामती नगरपालिका प्रशासन आणि कर्मचार्यांमधील नियोजनामुळे व समन्वयामुळे डेंग्यूचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, उपाययोजना तोकड्या पसे असल्याचे दिसून येत आहे.
मोकळ्या भूखंडावर डासांची उत्पत्ती
डेंग्यूच्या साथीबाबत राज्याचा आरोग्य विभाग व नगरपालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात बैठक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने रोगाचा फैलाव वाढत आहे. नगरपालिका आरेाग्य प्रशासनाने टायरचे दुकान तसेच घरोघरी सर्वेक्षण करून जनजागृतीचा प्रयत्न केला. मात्र मोकळ्या भूखंडामधील गवत व डबकी याविषयी केवळ नोटीसाच बजावल्या. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, राजकीय दबावामुळे या भूखंडावर कारवाई करता आली नाही. अशी चर्चा रंगत आहे. भित्तीपत्रक वाटणे, डेंग्यूबाबत घोषणा करून नागरिकांना सतर्क करणे, भंगार दुकानांना नोटीसा देऊन भेटी देणे, पातळ द्रव्यांची फवारणी करणे, खड्डयाच्या ठिकाणी मलेरिया ऑईलची फवारणी करणे अशा स्वरुपाच्या उपाययोजना नगरपालिकेने केल्याची माहिती नगरपालिकेचे पाणीपुरवठा व जलनिस्सारण प्रमुख रविंद्र सोनवणे व आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे यांनी दिली.
2 महिन्यात 4 हजार 752 तापाचे रुग्ण
डेंग्यू, मलेरिया, युरिनच्या तब्बल 2 हजार चाचण्या करण्यात आल्या. राज्य सुक्ष्मजीवाणू संशोधन समितीला बारामतीत पाचारण केले आहे. हा तापाचा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे यासाठी उपाययोजना केल्या जातील. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात 4 हजार 752 तापाचे रूग्ण आढळून आले आहेत. सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये महालॅब सुरू झाल्यामुळे सामान्य रुग्णांची सोय झाली आहे. या सोयीचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी सांगितले.