बारामतीत नवीन महसूल वाढीचे स्त्रोत निर्माण करा

0

बारामती । बारामती शहरात दर्जेदार विकासकामे करण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. यासाठी नगरपरिषद कार्यक्षेत्रात नवीन महसूल वाढीचे स्त्रोत निर्माण करण्याचे आव्हान प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले. शहरातील विविध विषयांची आढावा बैठक उपविभागीय कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे, नगरपरिषदेचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील सर्व भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व जंतुविरहीत पाणी देण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शहर हद्दीत लागवड करण्यात आलेल्या नवीन झाडांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून आरोग्य विभागाने डासांच्या प्रतिबंधासाठी फवारणी कराव्यात, अशा सूचना निकम यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाचे काटेकोरपणे नियोजन करून शहरातील स्वच्छता कायम राखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
शहर हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून त्याचा अहवाल उपविभागीय कार्यालयास सादर करावा. बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर वाहनांची वाहतूक ठप्प होत आहे. नगरपरिषदेने पार्किंग व्यवस्था करावी. पथदिव्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करून घेण्याच्या सूचनाही निकम यांनी यावेळी दिल्या. नगरपरिषदेने मार्च अखेर 100 टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करून महसूलात वाढ होणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील विकास कामांना गती देता येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. निकम यांनी मुख्याधिकार्‍यांकडून कामांच्या नियोजनाची माहिती जाणून घेतली.