बारामती । महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा धडाका सुरूच असून आठवडाभरात थकीत वीजबिले न भरणार्या बारामती परिमंडलातील 22 हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा 7 कोटी 70 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे.
ऑनलाइन पेमेंटची सुविधा
थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
बारामती, सातारासह सोलापूरही
वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे अडचणीत आलेल्या महावितरणने आठवडाभरापासून थकबाकी वसुलीची धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. बारामती परिमंडलातील बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलात थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणार्या 22 हजार 633 थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या सात दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे 7 कोटी 70 लाख रुपये थकबाकी आहे.
सोलापूर मंडल 11,594 ग्राहक
लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात थकबाकी आढळून आली. बारामती मंडल 6,095 ग्राहक (थकबाकी-3 कोटी 4 लाख), सातारा मंडल 4,944 ग्राहक (1 कोटी 13 लाख), तर सोलापूर मंडलात 11,594 ग्राहकांचा (3 कोटी 53 लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.