दुष्काळी गावांचा दौरा; राजकीय वातावरण तापले : भाजप, शिवसेना सुस्त
बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) पदाधिकार्यांच्यावतीने इंदापूर, बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा करण्यात आला. इंदापुरातील सराफवाडी, दगडवाडी, पिटकेश्वर, वरकुटे खु., झगडेवाडी त्याचप्रमाणे बारामतीतील पळशी, मासाळवाडी, मोढवे, मुर्टी या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याआगोदरच या दोन्ही तालुक्यांत जोरदार मोर्चेबांधणी होऊन वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कदाचित सत्तेमुळे सुस्त आहेत. एवढेच नव्हे तर या दोन्ही पक्षात लोकसभेच्या निवडणुकीची कोणतीही चर्चा नसून पक्षीय पातळीवर तालुक्यात सामसूम दिसत आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही तालुक्यांच्या आमदारांचे मौन
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने धनगर, मराठा या दोन्ही समाजाची गेली 50 वर्षापासून फसवणूक केली असून अनेक मागण्या प्रलंबित ठेऊन दिशाभूल केली आहे, असा आरोप रासपच्या महिला प्रदेश सचिव डॉ. अर्चना पाटील यांनी केल्यामुळे अधिकच वातावरण तापले आहे. मात्र त्यांच्या या आरोपाला काँग्रेस, राष्ट्रवादीने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे तर अधिकच गूढ वाढत चालले आहे. एरवी किरकोळ वादालासुध्दा राष्ट्रवादीचे नेते ताबडतोब पत्रकबाजी करून उत्तरे देत असतात. मात्र, याबाबतीत जे मौन बाळगण्यात आलेले आहे. ते अधिकच धक्कादायक आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांनी केलेला आरोप आम्हाला मान्य असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी कबूल करीत आहेत की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीबद्दल बारामती इंदापूर तालुक्यात अगदी सामसूम परिस्थिती आहे. या दोन्ही तालुक्यांचे आमदार राष्ट्रवादीचे असून कोणीही याबाबत बोलण्यास तयार नाही.
चौरंगी लढत
या पुढील काळात घोषणांची रेलचेल होणार असून मतदारांनी कोणाच्याही घोषणांना बळी पडू नये. सर्वच पक्ष फसवणूक करीत असतात. त्यामुळे राजकीय पक्षांवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्नही सर्वसामान्यांसमोर पडलेला आहे. गावात झालेल्या कामावरून राजकीय पक्षांचे मूल्यमापन करणे सोपे असते, असे काही गावातील नागरीकांनी सांगितले. यापुढील काळात खोटे बोलणार्यांना लोक बाजूला करतील व विकासाची झालेली कामे पाहूनच निर्णय घेतील केवळ घोषणाबाजी करणार्यांचे काहीच टिकणार नाही, असाही एक मतप्रवाह मतदारांसमोर चर्चेत दिसून येत आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात आत्तापर्यंत दुहेरी लढत होत होती. यापुढील काळात चौरंगी लढत होतील असे चित्र दिसत आहे. त्यामुळे उमेदवारांना चांगलेच झटावे लागले तरीही मतदार नेमका आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीत त्यामुळे अंदाज करणे अवघड आहे.
रासपने जनसंपर्क वाढवला
या दोन्ही तालुक्यात रासपने जनसंपर्क वाढवलेला असतानाच इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही जनसंपर्क वाढविण्यात अग्रेसर आहेत. पाटील यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला असून विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे हे कसे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत. असेच चित्र उभा केले आहे तर दुसरीकडे भरणे हे मागील पंधरा वर्षात तालुक्यात कोणतीही कामे झाली नाहीत, मात्र माझ्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. तर याच गदारोळात रासपचे प्रतिनिधी व पदाधिकारी या दोन्ही पक्षांनी आलटून पालटून सत्ता भोगली आहे. त्यामुळे भरणे व पाटील हे इंदापूर नागरीकांची फसवणूक करीत आहेत. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवून केवळ चिखलफेक करण्याचा कार्यक्रम करतात, असा आरोप डॉ. अर्चना पाटील यांनी केला आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. रासपच्या उमेदवार या अर्चना पाटील असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच त्यांच्या दौर्याला जास्त महत्त्व प्राप्त होत आहे. या दोन्ही तालुक्यात चौरंगी लढती होणार हे स्पष्ट झाल्यामुळे मतदारांपुढे भूमिका मांडण्याचेच कार्यक्रम सुरू आहेत.