सोमेश्वरनगर । वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत सुपे येथे घडलेल्या दरोड्याच्या दोन घटनांचा बारामती गुन्हे शोध पथकाने 48 तासांत पर्दाफाश केला. यामध्ये सहा दरोडेखोरांना 1 लाख 84 हजारांच्या मुद्देमालासह पोलिसांनीरा बारामती तालुक्यातील विविध गावांतून ताब्यात घेतले असून हे दरोडेखोर 18 ते 22 वयोगटातील असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
ऋषिकेश हनुमंत चव्हाण (वय 19), राजेश उर्फ छोट्या बाबजी खोमणे (वय 19), अक्षय उर्फ गोट्या छगन माकर (वय 21, तिघे रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती), साजन पवन भोसले (वय 19 रा. सोनगाव, ता. फलटण) तर दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुठलाही पुरावा हाती नसताना किंवा धागेदोरे नसताना खबर्यांमार्फत गुप्त बातमी काढली. त्याआधारे गुन्हेगारांना ठिकठिकाणी ताब्यात घेण्याची भूमिका पोलिसांनी बजावली. माळेगाव, सांगवी, शिरवली येथे आरोपी भागात आढळले. तसेच आरोपींनी वापरलेल्या दुचाकीही तसेच 9 हजार 100 रूपये रोख, मोबाईल हँडसेट, दोन पल्सर मोटारसायकल असा एकूण 1 लाख 84 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत गेला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत देव करीत आहेत.
21 हजारांचा ऐवज लुटला
बारामती-पाटस रस्त्यावर तसेच बारामती-मोरगाव-सुपे रस्त्यावर अज्ञात सहा व्यक्तींनी दोन दरोडे टाकले. पहिल्या दरोड्यात दोन दुचाकीवर येऊन दरोडेखोरांनी सुरेश रामचंद्र कुदळे यांना पहाटे तीन वाजता बारामती-सुपे रस्त्यावरील तांबेवस्ती (ता. बारामती) येथे चाकूचा व दगडाचा धाक दाखवून साडेतीन हजार रूपये रोख व विवोचा हँडसेट काढून घेतला. तर खराडेवाडी येथे महंमद सुलेमान यांच्या मालकीच्या टाटा कंपनीच्या कंटेनरला मोटारसायकली आडव्या मारण्यात आल्या. त्यास मारहाण करून रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचा हँडसेट असा 21 हजाराचा ऐवज लुटला.