बारामती महिला रुग्णालयास राज्यस्तरीय पुरस्कार

0

कायाकल्प सन 2017-18 अंतर्गत 20 लाखांचे पारितोषिक

बारामती । राज्य शासनाच्या वतीने कायाकल्प सन 2017-18 अंतर्गत राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यामध्ये बारामतीच्या महिला रुग्णालयास द्वितीय क्रमांकाचे 20 लाखांचे पारितोषिक जाहीर झाले असल्याचे महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

तीन वर्षात 65 हजार महिलांची मोफत तपासणी
एप्रिल 2015 पासून फेब्रुवारी 2018 अखेर या महिला रुग्णालयाने 3 हजार 656 नॉर्मल प्रसुती व 2 हजार 12 सिझेरीयन प्रसुती विनामूल्य केल्या आहेत. गेल्या तीन वर्षात रुग्णालयात 65 हजार 744 महिलांची मोफत तपासणी केली. 2 हजार 67 मोठ्या शस्त्रक्रिया व 3 हजार 342 छोट्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. महिला रुग्णालयाच्या वतीने विविध आरोग्यविषयक शिबीरे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने कर्करोग निदान शिबीर, सुनंदा पवार यांच्यामार्फत नर्सिंग कॉलेजच्या मुलींसाठी शिबीर, जि. प. सदस्य रोहित पवार यांच्यातर्फे सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ. बापू भोई यांनी उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन केले असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.