बारामती लोकसभेसाठी भाजपची जय्यत तयारी

0
पुणे : शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपनेही आता जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्या उपस्थितीत पुण्यात आज बैठक झाली. या बैठकीला सरोज पांडे यांच्या बरोबरच प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक उपस्थित होते. या दोघांनी बारामती मतदारसंघाचा विस्तृत आढावा घेतला. २०१४च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघ भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाला दिला होता आणि महादेव जानकर हे उमेदवार होते. जानकर यांनी कमळ अथवा धनुष्यबाण चिन्हाऐवजी कपबशी चिन्ह घेतले आणि निवडणूक लढविली. कमळ चिन्हाची लाट असताना ते चिन्ह न घेतल्याने जानकर पिछाडीवर गेले अन्यथा ते निवडून आले असते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जानकर यांना उमेदवारी दिली जाईल का? याविषयी शंका आहे. युतीबाबत काहीही होवो, आपली तयारी असली पाहिजे या धारणेने भाजपने निवडणुकुची तयारी चालू केली आहे आणि मिशन २०१९ असे नांव या मोहीमेला दिले आहे.
या मतदारसंघातून पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. २०१४मध्ये त्यांना कडवी लढत द्यावी लागली होती ते लक्षात घेऊन सुळे यांनी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविणे, भेटीगाठी घेणे अशा कामांचा सपाटा लावला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात त्यांना कमी मते मिळाली होती त्यामुळे त्या मतदारसंघावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या साडेचार वर्षात झालेल्या विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिका या निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळाले असल्याने भाजपच्या आशा वाढल्या आहेत.