बारावीचा पिंपरी-चिंचवडचा निकाल 90.87 टक्के

0

रिपिटर्स मुलांचा निकाल 38.35 टक्के

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 90.87 टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये देखील मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.58 टक्के, तर मुलांचा निकाल 87.79 टक्के इतका लागला आहे. आज निकाल जाहिर झाल्यावर आपल्या मुलांचे कौतुक करताना पालक दिसून येत होते.

14 हजार 864 विद्यार्थी उत्तीर्ण
बारावीच्या परीक्षेला बसेलल्या विद्यार्थ्यांचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. प्रथमच बारावीच्या परिक्षेला बसलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 16 हजार 357 विद्यार्थ्यापैकी 14 हजार 864 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या 7 हजार 18, तर मुलांची संख्या 7 हजार 846 इतकी आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 38.35 टक्के लागला आहे. परीक्षा देणार्‍या 558 विद्यार्थ्यांपैकी फक्त विद्यार्थी उतीर्ण झाली. दरम्यान, विद्यार्थी-पालकांना असलेली निकालाची उत्सुकता संपली असून चांगले गुण मिळवून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

16 महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल
जयहिंद हायस्कूल पिंपरी, श्री स्वामी समर्थ कॉलेज भोसरी, के. जी. गुप्ता ज्युनिअर कॉलेज चिंचवड, निर्मल बेथानी हायस्कूल काळेवाडी, अमृता ज्युनिअर कॉलेज निगडी, सेंट उर्सुला ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, कमलनयन बजाज चिंचवड, सरस्वती ज्युनिअर कॉलेज कुदळवाडी, हॉरिझॉन इंग्लिश मिडीयम स्कूल दिघी, सरस्वती विश्‍व विद्यालय ज्युनिअर कॉलेज निगडी, श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरी, क्रिएटीव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज निगडी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय रावेत, एस.बी.पाटील कॉलेज रावेत, युनिर्व्हसल ज्युनिअर कॉलेज बोर्‍हाडेवाडी, एस.एन.बी.पी कॉलेज रहाटणी.

दिवसभर नेट कॅफेवर गर्दी
आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नेट कॅफेवर दिवसभर गर्दी दिसून येत होती. आपण पास झालो असू ना, पास झालो तर किती टक्के पडले असतील अशा भावना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. तसेच आपली गुणपत्रिका हातात आल्यानंतर आनंदाने मुलांचे चेहरे आनंदाने भरून गेले. दिवसभर त्या गुणपत्रिकेसाठी ताटकळणार्‍या विद्यार्थ्यांना झालेला आनंद पाहून दिवसभराचा शीण पळून गेला असेल.