बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी

0

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. 11 जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाइलद्वारे एसएमएस करून निकाल प्राप्त करून घेता येईल, असे राज्य मंडळातर्फे जाहीर केले. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षेच्या या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली.

कोकणातून सर्वाधिक 95.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
त्यानुसार बारावीच्या परीक्षेत एकुण 89.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 86.65 टक्के तर मुलींची संख्या 93.05 टक्के इतकी आहे. तर विभागनिहाय विचार करायचा झाल्यास कोकणातून सर्वाधिक 95.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना हे निकाल दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता आला. तर 9 जूनला विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळणार आहेत. सकाळी 11 वाजता गुणपत्रिका शाळेपर्यंत पोहचवण्यात येतील. त्यानंतर तीन वाजल्यापासून शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप सुरू होणार आहे. तर 31 मे ते 9 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांना 400 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मुलांना धीर द्या!
बारावीचा निकाल लागला असून, यात अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही. कारण जुलै महिन्यात लगेचच फेरपरीक्षा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थी आणि पालकांनी ताण घेऊ नये. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शरद आखेगावकर म्हणाले की, निकालानंतर खरी भूमिका पालकांनी बजवावी. पाल्य अनुत्तीर्ण झाला, तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत, असा धीर त्याला द्यावा. पुन्हा प्रयत्न कर, त्यातून तुला जुलै महिन्यात यश मिळेलच, असा विश्वास द्यावा.

विभागनिहाय निकाल :
पुणे : 91.16%, कोल्हापूर : 91.40%, कोकण : 95.20%, लातूर : 88.22%, मुंबई : 88.21%,
औरंगाबाद : 89.83%, नागपूर : 89.05%, नाशिक : 88.22%, अमरावती : 89.12%