बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा शांततेत पार पाडण्याच्या सूचना

जि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची माहिती

 

जळगाव। जिल्ह्यात उच्च माध्यमिकची शालांत परीक्षा (एचएससी-बारावी) शुक्रवारी, 4 मार्च तर माध्यमिकची (एसएससी-दहावी) परीक्षा मंगळवारी, 15 मार्चपासून सुरु होत आहे. जिल्ह्यात दोन्हीही परीक्षा निकोप आणि शांततेत पार पाडण्याच्या सक्तीच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधितांना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची स्क्रीनिंगद्वारे तपासणी होणार आहे. परीक्षेसाठी भरारी पथक, फिरते पथक यांच्यासह इतर समित्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी पत्रकारांना दिली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण उपस्थित होत्या.

जिल्ह्यात बारावीची परीक्षा 4 मार्चला सुरु होऊन 30 मार्चला संपणार आहे. तसेच दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होऊन 4 एप्रिलला संपणार आहे. बारावीसाठी 48 हजार विद्यार्थी तर दहावीसाठी 58 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीसाठी 282 केंद्र तर दहावीसाठी 761 परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षांसाठी सहा भरारी पथक, फिरत्या पथकांचीही नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्रांना परीक्षा सुरळीत सुरु राहण्यासाठी स्थानिक तहसीलदार, पं.स.चे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह समित्या भेटी देऊन पाहणी करतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी सीएस, जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचीही समिती स्थापन केली आहे.

आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर
कोरोना काळात विद्यार्थ्यांची लेखणाची सवय कमी झाल्याने तीन तासाच्या पेपरला अर्धा तास तर दोन तासाच्या पेपरला पंधरा मिनिटे वेळ जास्त दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे. कोरोना नियमांचे पालन करुन 10.30 वाजता पेपर सुरु होतील. शुक्रवारी, 4 मार्च रोजी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होणार आहे. पालकांनी गर्दी न करता पाल्यांना शांततेत पेपर लिहिण्यास सहकार्य करावे. त्यांच्यात परीक्षेची भीती निर्माण होणार नाही, असे वातावरण निर्माण करावे. ज्या त्या शाळेतच परीक्षा होणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सक्तीच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी, नियुक्ती कर्मचार्‍यांना दिल्या असल्याचेही जि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.