बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘बोर्ड’ सरसावले

0

पुणे । उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांची तयारी करावी लागते. या परीक्षांंच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड पुढे सरसावले आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांंसाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रश्नपेढी तयार करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र (झउचइ) या विषयांमधील बहुपर्यायी प्रश्नांची तयारी करावी लागते. विद्यार्थ्यांना या तयारीसाठी मदत व्हावी या उद्देशाने मंडळाकडून ऑनलाईन प्रश्नपेढी तयार करण्यात येत आहे.

शिक्षकांना प्रश्न पाठविण्याचे आवाहन
प्रश्नपेढीत भर टाकण्यासाठी शिक्षक, विषयतज्ज्ञ यांना प्रश्न पाठवता येणार आहेत. ज्या शिक्षकांना या पोर्टलसाठी प्रश्न द्यायचे आहेत. त्यांनी ते प्रश्न विषयनिहाय तयार करून प्रश्नाच्या तक्त्यात इयत्ता, विषय, घटकाचे नाव व उपघटक उत्तराच्या विश्लेषणासह 30 सप्टेंबरपर्यंत मंडळाच्या या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. पाठवलेले प्रश्न हे विषयानुसार बहुपर्यायी असणे आवश्यक आहे. या प्रश्नांची मंडळातील तज्ज्ञांकडून तपासणी होऊन योग्य ते प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांसाठी पोर्टलवर देण्यात येणार आहेत. हे प्रश्न केवळ सरावासाठी असून परिक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम वेगळा असल्याने यातूनच परीक्षेसाठी प्रश्न येतील असे समजण्याचे काहीच कारण नसल्याचे देखील मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रश्नपेढीत भर घालण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी प्रश्न पाठविण्याचे आवाहन केले आहे.