बारावी परिक्षेत सावित्रीच्या लेकी चमकल्या; नंदूरबार जिल्हा अव्वल

0

जळगाव। उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेच्या निकाला यंदाही सर्वच शाखांमध्ये मुलींचेच वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे. विज्ञान शाखेच्या तुलनेत गुणांची कमाई करण्याची हमखास संधी कला शाखेत फारशी नसल्याने यंदाही कला शाखेच्या निकालाची टक्केवारी रोडावली. उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक जिल्ह्याचा लागला आहे. अभ्यासाच्या नियोजनात पालकांची मुलांना होत असलेली मदत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी महत्वाची ठरल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 95.20 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नाशिक व लातूर विभागाचा 88.22 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 91.16 टक्के, नागपूर विभागाचा निकाल 89.05 टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल 89.83 टक्के, मुंबई विभागाचा निकाल 88.21 टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल 91.40 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 89.12 टक्के लागला. राज्यात 14 लाख 29 हजार 478 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. त्यापैकी 12 लाख 79 हजार 406 म्हणजे 89.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शाखानिहाय निकाल
राज्यात विज्ञान शाखेची परिक्षा 5 लाख 38 हजार 486 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 5 लाख 16 हजार 117 म्हणजे 95.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून परीक्षा 4 लाख 75 हजार 38 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 3 लाख 89 हजार 80 म्हणजे 81.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून 3 लाख 57 हजार 74 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 3 लाख 23 हजार 415 म्हणजे 90.57 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.