बारा वर्षांच्या मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई,- घाटकोपर येथून एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या एका आरोपीस अवघ्या चार तासांत पंतनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रभू संतोष खेडेकर असे या अपहरणकर्त्याचे नाव असून त्याच्या तावडीतून या मुलीची सुखरुप पोलिसांनी सुटका केली आहे. प्राथमिक तपासात प्रभूने दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी या मुलीचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. बारा वर्षांची ही मुलगी घाटकोपर परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. सध्या ती तेथीलच एका शाळेत सातवी शिकते. काल सकाळी नऊ वाजता ती घरातून क्लासला निघून गेली. यावेळी तिथे प्रभू आला आणि त्याने तिचे अपहरण केले होते.

काही वेळाने त्याने तिच्या वडिलांना फोन करुन त्यांच्या मुलीचे अपहरण झाले आहे. मुलीला सुखरुप पाहायचे असेल तर दोन लाख रुपयांच व्यवस्था करा. नाहीतर मुलीचा मृतदेहच घरी पाठवू अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

दिवसाढवळ्या आणि भरस्त्यात एका बारा वर्षांच्या मुलीचे खंडणीसाठी अपहरण झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासांत पोलीस उपायुक्त सचिन पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांच्या पथकातील महेश राळेभात, केवळे, शिंदे, अंकोलीकर, किरण पाटील, अण्णासाहेब कदम, दया जाधव, कडलग, घोसाळकर, शेख, पिसाळ, जाधव, ठोंबरे, गजधाने यांनी प्रभू खेडेकर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या तावडीतून पोलिसांनी या मुलीची सुखरुप सुटका केली. प्रभू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात मंदिरातून मूर्ती चोरी करणे, चोरी, मारामारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याने रत्नागिरीच्या देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातून दोन मूर्ती चोरी केल्या होत्या. त्याच्याविरुद्ध अपहरणासह पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.