जळगाव । शिरसोली गावाच्या काही अंतरावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेले बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे संचालक देविदास नारायण अस्वार (बारी) यांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अस्वार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सकाळी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह ताब्यात देण्यात आले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी जमली होती.
पोटावरून गेले चाक
शिरसोली गावातील बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे संचालक श्रदेवीदास नारायण अस्वार (बारी) (वय-62) हे नेहेमी आपल्या पत्नी यांच्यासोबत सकाळी मॉर्निंग वॉकला जात असत. मात्र, आज मंगळवारी सकाळी ते एकटेच मॉर्निंग वॉकला घरातून निघाले. शिरसोली गावाजवळी हॉटेल प्रित जवळ रस्त्याच्या कडेला वायम करत असतांना जळगावकडे जाणार्या एक भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात वाहनाचे चाक अस्वार यांच्या पोटावरून गेल्याने ते चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिरसोली गावातील काही ग्रामस्थांना अस्वार हे मयत अवस्थेत रस्त्यात मिळून आले. यावेळी अस्वार यांचे नातेवाईक देखील शिरसोली रस्त्यावरून जात असतांना त्यांनी अस्वार यांना मृत अवस्थेत पाहून लागलीच रूग्णालयात नेले. त्यानंतर अपघाताबाबत कुटूंबियांना माहिती दिली. वैद्यकीय अधिकार्यांनी अस्वार यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. रूग्णालयात ग्रामस्थांसह नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तर कुटूंबियांनीकडून आक्रोश करण्यात येत होता. सकाळी शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, धडक देणार्या वाहनाचा शोध सुरू असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मयत बारी हे शिरसोली पंचक्रोशीतील देविदास वायरमण म्हणून प्रख्यात होते. विहिरीतील पाण्याच्या मोटार दुरुस्ती व इलेक्ट्रॉनिक असा त्यांचा व्यवसाय आहे. आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने बारी समाजावर व गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पच्छात दोन मुले, दोन मुली व पत्नी असा परिवार आहे