बार्शीत बारावीचा पेपर फुटला!

0

इंग्रजीचा पेपर सुरु होताच तासाभरात व्हायरल

सोलापूर : बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात होताच, पहिल्याच दिवसाचा इंग्रजीचा पेपर फुटल्याने शिक्षण विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वसंत ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. इंग्रजीचा पेपर सुरु होताच तासाभरात या पेपरची छायाचित्रे व्हॉटसअ‍ॅपसह सोशल मीडियावर झळकली. तसेच, त्याच्या उत्तरपत्रिकाही तयार करण्यात आल्या होत्या. पेपर आणि उत्तरपत्रिका दोन्हीदेखील व्हॉटसअ‍ॅपवर झळकल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेची गांभिर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित कॉलेजचीही चौकशी करण्यात येणार आहे. पेपर सुरु होऊन तासाभरानंतर हा प्रकार घडल्याने या पेपरची पुनर्परीक्षा घेण्याची शक्यता राज्य परीक्षा बोर्डाने फेटाळून लावली आहे. तथापि, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पेपर फुटला नाही, कॉपी झाली!
राज्यभरात बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर सकाळी 11 वाजता सुरु झाला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयातून या पेपरची छायाचित्रे व्हॉटसअ‍ॅपद्वारे बाहेर आली तर तांबेवाडीच्या आश्रम शाळेत काहीजणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्‍नपत्रिका आढळून आली. त्यानंतर तातडीने या महाविद्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली. महाविद्यालयाने पोलिसांकडे तक्रार दाखल करून परीक्षा मंडळालादेखील तातडीने माहिती दिली. त्यानंतर तातडीने झडती मोहीम हाती घेण्यात आली. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की परीक्षा सुरु झाल्यानंतर प्रश्‍नपत्रिका व्हायरल झाल्याने हा पेपर फुटण्याचा नव्हे तर कॉपीचा प्रकार आहे. याबाबत सविस्तर अहवाल मागविला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पेपर फुटलेला नसल्याने विद्यार्थ्यांनी घाबरून जावू नये. तसेच, पुनर्परीक्षा घेण्याचाही काही संबंध नाही, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली.

राज्यभरात कॉपीचे प्रकारही जोरात
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तांबेवाडीच्या आश्रम शाळेतील काही जणांच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिकादेखील आढळून आली आहे. सेक्शन ए, बी, आणि सी या प्रश्‍नपत्रिका फुटल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरीही पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्‍नपत्रिका फुटल्याने परीक्षा मंडळाच्या गोंधळावर शिक्कामोर्तब झाले आहे. इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यावर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे नातेवाईक कॉपी पुरविताना आढळून आलेत. दरम्यान, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतो, राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.