जळगाव । जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील 3 वर्षीय चिमुकल्यावर गावातील नराधमाने 21 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमीष दाखवून अनैसर्गीक कृत्य केले. या प्रकरणी बुधवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी नराधमास 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून 25 हजार रुपये पिडीत बालकास आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.
सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले 9 साक्षीदार
देऊळगाव गुजरी येथील विनोद समाधान गणगे (वय 27) याने 21 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमीष दाखवून 3 वर्षाच्या चिमुकल्याला मरीमाता मंदिरात घेऊन गेला. त्या ठिकाणी विनोदने चिमुकल्यावर अनैसर्गीक अत्याचार केला. त्यावेळी चिमुकल्याने आराडा ओरड केल्याने मंदिराच्या बाजुला खेळणार्या लहान मुलांनी हा प्रकार बघितला. त्यानंतर पळत जाऊन त्यांनी पिडीत मुलाच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. या प्रकरणी पिडीत मुलाच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी विनोद गणगेला तत्काळ अटक केली होती. या प्रकरणी न्यायाधीश दरेकर यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यात सरकारतर्फे अॅड. शीला गोडंबे यांनी 9 साक्षीदार तपासले. तर आरोपीतर्फे अॅड. विजय दर्जी यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी लहान मुले आणि तीन वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
अशी सुनावली शिक्षा
चिमुकल्यावर अनैसर्गीक कृत्य करणारा नराधम विनोद गणगे याला न्यायाधीश दरेकर यांनी यांनी बुधवारी दोषी धरत शिक्षा सुनावली. त्यात कलम 377 नुसार दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि दहा हजार रूपये दंड ,दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, कलम 506 नुसार तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि एक हजार रूपये दंड, न भरल्यास दोन महिने साधी कैद, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 च्या कलम 4 नुसार दहा वर्षाची सक्तमजूरी तसेच पाच हजार रूपये दंड, न भरल्यास सहा महिने साधी कैद, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 च्या कलम 6 नुसार दहा वर्ष सक्तमजूरी तसेच दहा हजार रूपये दंड, न भरल्यास सहा महिने साधी कैद सुनावली आहे.
असा दंड..
आरोपी गणगे याला या सर्व शिक्षा एकत्रीत भोगायाच्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असल्यापासून 10 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेतील 25 हजार रुपये पिडीत मुलाला देण्याचे आदेश दिले आहेत.