गाईड पुस्तक, क्लासनाही परवानगी घेऊनच पुस्तके छापावी लागणार
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत माहिती
मुंबई :- दहावीचे बालभारतीचे पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉटस्अॅपवर व्हायर झाले. सरकारने खबरदारी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याबाबत शुक्रवारी विधानसभेत शिवसेनकडून सरकारला चांगलेच धारेवर धरले गेले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी याबाबत शिक्षणमंत्र्यांना जाब विचारला असता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापुढे राज्य सरकार बालभारती पुस्तकाचे कॉपिराइट घेणार आहे. त्यामुळे २१ अपेक्षित सारख्या गाइडना पुस्तके काढण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. क्लासेसनाही सरकारची परवानगी घेतल्याशिवाय पुस्तके छापता येणार नाहीत, अशी घोषणा तावडे यांनी केली.
पुस्तकाबरोबर विक्री करून नफेखोरी
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे छपाईच्या अगोदरच पुस्तक व्हायरल झाल्यामुळे या पुस्तकाच्या आधारे गाईडची निर्मिती करणार्या कंपन्यांना वेळे आधीच गाईड छापून बालभारती पुस्तकाबरोबर विक्री करून नफेखोरी केली. ज्यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली त्यांची चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.
प्रकाराबाबत सायबर सेलकडे तक्रार
यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे पुस्तक प्रकाशीत होण्याच्या मार्गावर असताना दुसर्या टप्प्यात ते व्हॉटस्अॅपवर आले. त्यानंतर चार टप्प्यांनी हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यामुळे मूळ पुस्तकात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. त्याचा गाइड कंपन्यांना कोणताही लाभ झाला नाही. सरकारने असे पुस्तक सहज उपलब्ध होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली आहे. झालेल्या प्रकाराबाबत सायबर सेलकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर संबंधित गाइड कंपन्यांवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न आशीष शेलार यांनी उपस्थित केला असता पोलीस तपास सुरू असून या प्रकरणात गाइड कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई केली जाईल असे विनोद तावडे यांनी सांगितले. यावर ही चौकशी कालबद्ध स्वरूपात करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.
गाइडला पर्याय म्हणून पुस्तके प्रकाशित करणार
बालभारती पुस्तकांचे कॉपिराइट घेण्याबरोबरच गाइडला पर्याय निर्माण करण्यासाठी सरकार सप्लिमेंटरी स्टडी मटेरियल प्रकाशित करणार आहे. यामुळे गाइडमुळे केवळ एक्झाम टेक्निक शिकवली जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्याऐवजी सरकारच्या स्टडी मटेरियलमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे विनोद तावडे म्हणाले.