बालभारती-पौड रस्त्यासाठी लवकरच नेमणार सल्लागार!

0

पुणे । विधी महाविद्यालय रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या बालभारती ते पौड फाटा या टेकडीवरील रस्त्यासाठी महापालिकेकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या सुनावणीत हा रस्ता 205 खाली न करता आधी त्याची अलाईमेंट निश्‍चित करावी, असे आदेश पालिकेस दिले होते. त्यानुसार, पालिकेने न्यायालयात हा रस्ता महापालिकेच्या सुधारीत प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या विकास आराखड्यास मान्यता मिळलेली असल्याने त्याचे नकाशे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. त्यानंतरच हे काम सुरू केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

रस्त्याचा होणार अभ्यास
या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठीचे जाहीर प्रकटन नुकतेच प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार, विधी महाविद्यालय रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूकीची स्थिती, पर्यायी रस्त्याची आवश्यकता तसेच या रस्त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. 2017-18 च्या अंदाजपत्रकात सल्लागार नेमण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून या निधीतून हे काम केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

रस्त्याचे नकाशे न्यायालयात करणार सादर
मुंबईकडून औंध, बालेवाडीकडून कोथरूडकडे जाण्यासाठी तसेच शहराच्या दक्षिण उपनगरांमध्ये जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने 205 कलमाअंतर्गत बालभारती ते पौड फाटा असा रस्ता आखला होता. मात्र, हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी त्यास विरोध केला होता. न्यायालयाने कलम 205 खाली हा रस्ता करण्यास महापालिकेस मनाई करत आधी या रस्त्याची आखणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेने हा रस्ता सुधारीत प्रारूप विकास आराखड्यात आखण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. आता विकास आराखडा मंजूर झाल्याने या रस्त्याचे नकाशे न्यायालयात सादर केले जाणार असून त्यानंतर प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.