पुणे : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचे वाहतूक पोलिसांशी हुज्जत प्रकरणावरून आता पोलीस दलातच सुंदोपसुंदी सुरू झाली आहेे. कारवाई दरम्यान वारजे वाहतूक विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील डी. पाटील यांनी शिवाजीनगर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर डोमसे यांना फोन करुन गाडी सोडण्यास सांगत दबाव आणल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही पाटील यांनी अनेक वेळा गाड्या सोडण्यासाठी फोन करुन दबाव आणल्याची लेखी तक्रार डोमसे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस खात्यातच सुंदोपसुंदी सुरू झाली असून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, बालवडकरला अटक झाल्यानंतर पाटील यांनी न्यायालयात स्वतः हजर राहून जामीन मिळवून देण्यासाठी मदत केल्याचेही समोर आले आहे.
जंगली महाराज रस्त्यावर शिवाजीनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डोमसे पाच दिवसांपूर्वी (10 एप्रिल) वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांची मोटार नो पार्किंगमध्ये असल्याने डोमसे यांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालवडकर यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकार राजकीय वर्तुळासह शहरात गाजले होते. बालवडकर यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच, बालवडकर यांना एक दिवस येरवडा कारागृहाची हवा खावी लागली होती.
योग्य त्या कारवाईची मागणी
दरम्यान, अमोल बालवडकर यांच्या गाडीवर कारवाई केल्यानंतर डोमसे यांना अवघ्या दहा मिनिटांतच सुनील पाटील यांनी फोन केला. तसेच, ती गाडी माझ्या मित्राची असून, ती सोडून देण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. सुनील पाटील यांनी अनेक वेळा गाड्या सोडून देण्यास फोन करुन दबाव आणल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकाराबाबत डोमसे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात घडलेला प्रकार, तसेच पाटील यांच्याकडून कारवाईत होणार्या हस्तक्षेपाची उजळणी करण्यात आली आहे. तसेच, पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी डोमसे यांनी विनंतीपूर्वक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बालवडकर यांना जामीन मिळावा म्हणून पाटील यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून राहून धावपळ केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.
दारु प्यायलायी तपासणी कशी केली?
डोमसे दारु प्यायल्याची तक्रार बालवडकर यांनी डॉ. मुंढे यांच्याकडे तसेच नियत्रंण कक्षाला फेन करुन केली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे यांनी डोमसे यांना शिवाजीनगर वाहतूक शाखेत बोलवून घेतले. तेथे त्यांची ब्रेथ अॅनॅलायझर टेस्ट घेण्यात आली. उपायुक्त डॉ. मुंढे यांनीच ही चाचणी घेण्यास मला सांगितल्याचेही बालवडकर यांनी सांगितले होते, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे कुणाच्या आदेशावरून टिपरे यांनी घटनास्थळी येऊन ही चाचणी घेतली, हे कळू शकलेले नाही.
पाटील न्यायालयात कसे?
बालवडकर यांना जामीन मिळवून देण्यासाठी पाटील यांनी मदत केली. वारजे वाहतूक विभागात कर्तव्यावर असताना ते न्यायालयात कोणाच्या आदेशाने व कशासाठी आले, असा प्रश्न डोमसे यांनी उपस्थित केला आहे. प्रामाणिकपणे नोकरी करुनही या सर्व प्रकाराचा मनस्ताप होत असल्याचेही त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
वरिष्ठांची बोलण्यास टाळाटाळ
या प्रकरणास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना विचारले असता, या प्रकरणावर अधिक बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली. डोमसे यांची लेखी तक्रार आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मोघम उत्तर डॉ. मुंढे यांनी दिले.