भुसावळ (गणेश वाघ) :- तब्बल वर्षभरापासून बेपत्ता झालेला बालशौर्यपुरस्कार प्राप्त नीलेश भिल्लचा शोध लागला असून तो गोरखपुरातील अखेर चाईल्ड लाईन संस्थेला सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो या संस्थेत असून भाषेच्या अडचणीमुळे त्याला गावाचे नाव व्यवस्थित सांगता येत नसल्याची माहिती प्राप्त झाली. नीलेश हा त्याचा लहान भाऊ गणपतसह 17 मे 2017 रोजी कोथळी येथून बेपत्ता झाला होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी गणपतचा कानपूरात शोध लागला होता मात्र नीलेश भिल्ल बेपत्ताच होता. मुक्ताईनगर पोलिसांनी संपूर्ण देशभरात नीलेश बेपत्ता झाल्याबाबत पोस्टर्स लावले होते शिवाय सर्वच रेल्वे स्थानकावर त्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. पीएमओ कार्यालयानेदेखील शौर्य हरवल्याची गांभीर्याने दखल घेतली होती.
शौर्य आढळले गोरखपूरात
गणपतसोबत घरातून बेपत्ता झालेला नीलेश भुसावळ येथून कानपूर व तेथून गोरखपूरपर्यंत पोहोचला. गोरखपूरातील कर्मलपूर येथील चाईल्ड लाईन संस्थेत तो दोन महिन्यांपासून असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोथळी गाव त्याला नेमके भाषेच्या अडचणीमुळे सांगता येत नसल्याने इंटरनेट तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर शनिवारी मुक्ताईनगर पोलिसांशी संबंधित संस्थेचा संपर्क झाला. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीलेशला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवले होते हे विशेष ! दरम्यान, नीलेश सापडल्याची बातमी त्याच्या आई-वडीलांना कळताच त्यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाचे अश्रूच तरळले.