बालेवाडी येथील जागा पीएमआरडीएला

0

पुणे । शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी बालेवाडी येथील सुमारे 15 एकर जागा पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पीएमआरडीला व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते हिंजवडी असा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे नुकत्याच घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत बालेवाडीची पंधरा एकर जागा प्राधिकरणाला देण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मिटकॉन संस्थेच्या जवळ असलेली ही जागा सध्या विनावापर पडून आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत आणि बालेवाडी मैदानाच्या समोरील बाजूला असलेल्या या जागेचा व्यावसायिकदृष्ट्या चांगला वापर होऊ शकतो. त्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारणे शक्य असल्याने ही जागा प्राधिकरणाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

हा मार्ग सुमारे 23 किलोमीटरचा आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. हा मार्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पीएमआरडीएने काही जागांची मागणी केली होती. पीपीपी तत्त्वावर निवड केल्या जाणार्‍या कंपनीकडे ठराविक कालावधीसाठी ही जागा देण्यात येणार असून, कराराचा कालावधी संपल्यानंतर ही जागा पुन्हा पीएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. मेट्रो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही जागा संबंधित कंपनीला देण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत बालेवाडीची जागा पीएमआरडीएला देण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.

पीपीपी मॉडेलद्वारे निधी
मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत आणि बालेवाडी स्टेडियमच्या समोरील बाजूस असलेल्या या जागेचा व्यावसायिकदृष्ट्या चांगला वापर होऊ शकतो. त्यामुळे महिनाभरापूर्वीच पुणे मेट्रो आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या दोघांनी बालेवाडी येथील या सरकारी जागेची मागणी केली होती. विशेष म्हणजे, येथे दोन्ही मेट्रोचे स्थानक, डेपो अथवा मेट्रोसंदर्भातील कोणतेही बांधकाम होणार नव्हते. तरीही या सरकारी जागेवर पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलद्वारे व्यावसायिक संकुल उभे करून निधी उभारण्याचा संकल्प होता.