जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जिल्हा महिला व बाल विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून बाल हक्क दिवस साजरा करण्यात आला. बालकांचे हक्क आणि त्यांचे प्रश्न शासनासमोर ठेवण्यासाठी बाल हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या व्यासपीठावर जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आणि समतोल प्रकल्प प्रमुख दिलीप चोपडा उपस्थित होते.
मुलांच्या बाबत घडणाऱ्या अनेक वाईट घटनांविषयी समाजात जनजागृती व्हावी आणि बाल हक्कांबाबत शासन अधिक कठोर व्हावे या उद्देशाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कधी मुलींची छेडछाड, कधी अपहरण, कधी बलात्कार तर कधी छोट्या अर्भकांना बेवारस सोडून देणे, बालमजूर अशा सर्व बालकांच्या बाबतीत होणारे अन्यायास वाचा फोडून एक बालप्रेमी समाज निर्मितीचा अथक प्रयत्न केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र मुळातच आपण मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित करायला हवा.
कार्यक्रम प्रसंगी डॉ. शैलेजा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जयश्री पाटील यांनी बाल हक्क सनदेचे वाचन तर अनादी जोशी आणि श्रावघी पाठक या विद्यार्थींनी सूत्रसंचालन केले. दिलीप चोपडा यांनी आभार व्यक्त केले. राहुल पवार, अॅड. आशिष पाटील, कादर मेमन, सारिका मेटकर, चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव, प्रदीप पाटील, वृषाली जोशी, मनोज कुलकर्णी, धनश्री राजपूत, विश्वजित सपकाळे, वसिम तडवी, महेंद्र पाटील, किरण तोडकरी आदींनी कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले.