मुंबई | गेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘बाहुबली’ची उपमा दिलेले ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत, कायदा-सुव्यवस्था प्रश्नावरून भाजपा सरकारचीच कोंडी केली. त्यांनतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षानेही सरकारची गोची केली. खडसेंसह विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची पार भंबेरी उडाली.
प्रश्नोत्तराच्या तासात कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पाबाबत राज्यात सायबर क्राईमचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा शाबित होण्याच्या प्रमाणाचे काय, किती जणांना शिक्षा झाली, हेही सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी पृथ्वीराज यांनी केली. विरोधकांच्या या प्रश्नावर खडसेंनीही सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
महिला आमदाराला अश्लील मेसेज
इतर महिलांचे सोडा पण, महिला आमदारांनाही अश्लील मेसेज आले आहेत. त्याचे पुढे काय झाले, हे सरकारने सांगावे, असा खडा सवाल करूनही खडसेंनी आपल्याच सरकारला धारेवर धरले. याबाबत पुढे तपासात काय प्रगती झाली, ते सरकारने स्पष्ट करावे या खडसेंच्या मागणीने सत्ताधाऱ्यांना सभागृहात अवघडल्यासारखे होत होते. जर आमच्यासारखे सदस्य सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, असे म्हणत खडसे यांनी सरकारच्या वर्मावर बोट ठेवल्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. खडसेंचे भाषण संपताच विरोधक आक्रमक झाले.
वर्षभर यातना भोगल्या
माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला खोट्या सायबर आरोपांच्या जंजाळात वर्षभर कितीतरी यातना भोगाव्या लागल्या आहेत. मला मंत्रिपद सोडावे लागले. देशभरात माझी बदनामी झाली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमशी माझा संबंध जोडला गेला. एक वर्ष मी यातना भोगल्या. माझ्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्या मनीष भांगालेला पोलिसांनी अटक केली. मात्र कायदा सक्षम नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. त्याला सहज जामीन मिळाला; पण माझ्या प्रतिमेवर लागलेला डाग तसाच राहिलाय. याची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळे हे कायदे कठोर करा. पकडलेला आरोपी सुटता कामा नये, याची तरतूद करा.
एकनाथ खडसे,
ज्येष्ठ भाजप नेते
रणजीत पाटील निरुत्तर
खडसे व विरोधकांच्या आक्रमक सवालांपुढे हतबल राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी थातुर-मातुर आकडेवारी देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पोलीसांना या कायद्याचे शिक्षण ट्रेनिंगमध्ये देण्यात येते. नाशिकमध्ये सायबर ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून 118 लोकांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. राज्यात 47 सायबर लॅबची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांनी त्यांना थांबवत गुन्हा शाबित झाल्याची नेमकी आकडेवारी मागितली. यावर सरकारकडे अशी नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगून रणजीत पाटील यांनी गृहमंत्रालयाकडून ही माहिती घेऊन सभागृहापुढे ठेवली जाईल, असे आश्वासन दिले. यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेत गोंधळ घातला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी मंत्री गोल-गोल उत्तरे देत असून हा प्रश्न राखून ठेवण्याची विनंती अध्यक्षांना केली. मात्र अध्यक्षांनी ही सूचना अमान्य केली.
खडसेंवर पुन्हा कटप्पाचा वार
दरम्यान, मुंबईतील एका आघाडीच्या दैनिकाने, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मंत्रिमंडळातील पुनरागमन लांबण्याची शक्यता मंगळवारी एका बातमीत वर्तविली आहे. खडसे हे पुन्हा डोईजड होण्याची भीती असल्याने माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल विधिमंडळात मांडणे टाळले जाईल, असे या वृत्तात म्हटले आहे. खडसे यांच्यावर चौकशी अहवालात काही ताशेरे असल्याने पक्षश्रेष्ठींकडे प्रतिकूल मत व्यक्त केले गेल्याचे बातमीत म्हटले आहे. विधिमंडळ अधिवेशनात हा अहवाल मांडून सरकारविरोधात विरोधकांना आयते कोलीत देण्यापेक्षा तूर्तास हा अहवाल गुलदस्त्यातच ठेवून खडसे यांच्या पुनरागमनाचा मुद्दा अडकवून ठेवण्याची भूमिका घेतली गेल्याचेही त्यात नमूद आहे. खडसे बाहुबली असतील तर कटप्पा कोण, या प्रश्नाचे उत्तर जयंत पाटील यांनी दिलेले नव्हते. आजही ते अनुत्तरीत असले तरी पक्षातीलच काही कटप्पा हे खडसेंचा बाहुबली करताहेत, अशी चर्चा वर्तुळात आहे. त्यातूनच इतके दिवस शांत असलेले व गेल्या महिन्यात सरकारच्या बाजूने शिवसेनेला शिंगावर घेणारे खडसे मंगळवारी अचानक गृहमंत्रालयावर घसरल्याचा अंदाज बांधला जातोय. खडसेंचा हा अवतार कायम राहिल्यास सरकारची पळता भुई थोडी होऊ शकते. मात्र बाहुबली-कटप्पाच्या या खेळाने सरकार सभागृहात अडचणीत येत असल्याने विरोधक चांगलेच खुश आहेत.
न्युमेरीक्स
2014-17 – तीन वर्षात वाढ
6,640 – सायबर गुन्हे नोंद
1640 – गेल्या वर्षात दाखल
666 – आरोपींना अटक
104 – चार्जशीट दाखल