शिक्रापुर । शिरुर तिालुक्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. येथे त्यांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भुमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगत याठिकाणी मराठा व बौध्द असा कोणताही वाद नसल्याचेही जाहीर केले. त्यामुळे वढुतील सामाजीक वादाला अखेर पुर्णविराम मिळाला आहे.
श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे 29 डिसेंबर रोजी गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाच्या नामफलकावरून उद्धभवलेला वाद व 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल यामुळे या परिसराची मोठी आर्थिक हानी व जिवीतहानी झाली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान 1 तारखेपासुन वढु बुद्रूक, कोरेगाव भीमा, सणसवाडी तसेच शिक्रापुर या गावांमध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर 3 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले होते. गुरुवारी येथील जनजीवन पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुएझ हक, स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रमेश गलांडे हे या चारही गावांमधील तणावपुर्ण परिस्थिती निवारणासाठी मराठा व दलित समाजाच्या गावोगावच्या बैठका आयोजीत करून सलोख्याचे वातावरण तयार करण्यावर भर देत असल्याने परिस्थिती नियंत्रणास येण्यात भर पडली आहे.
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरुवारी कोरेगाव भिमाचा आठवडा बाजारही प्रशासनाने बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. दरम्यान आज चौथ्या दिवशी कोरेगाव भिमा, सणसवाडी व वढु बुद्रुक येथिल जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
बाहेरच्यांचा हस्तक्षेप नको
यापुढील काळात वढु बुद्रुक गावात होणार्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात बाहेरच्या संघटना व व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, असा निर्धार माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी व्यक्त केला. तसेच छत्रपती संभाजी रांजाची जयंती व पुण्यतिथीचा कार्यक्रमही ग्रामस्थ व ग्रामपंचायत स्वत: करेल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांची बैठक
दरम्यान वढु येथिल दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीत गोविंद गायकवाड समाधीचे इतिहासकालीन संदर्भ मिळाल्यानंतर त्यानुसार गोविंद गायकवाड समाधीजवळ फलक लावून गोविंद गोपाळ गायकवाड यांचे समाधीस्थळही पुर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, साहेबराव भंडारे, राजाराम आहेर, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत शिवले, सचिन भंडारे, मारुती भंडारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी घेतली फटांगडे कुटुंबियांची भेट
कोरेगाव भीमाच्या दंगलीत मृत झालेला सणसवाडी येथील युवक राहुल बाबाजी फटांगडे याच्या कुटुंबियांची पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी भेट घेतली. राहुलच्या आई जनाबाई व लहान भाऊ विष्णू यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी सरकारच्या वतीने सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासनाने जाहीर केलीली मदत मिळेलच परंतु मोठे कुटुंब असल्याने कुटुंबासाठी अधिक मदतीची मागणी केली जाईल, याबाबत सणसवाडीतील गावकर्यांनी निवेदन द्यावे, असे बापट यांनी सांगितले. तसेच या घटनेला कारण असलेल्यांची कसून चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाजार समिती संचालक दत्ताभाऊ हरगुडे यांनी घरातील कमवता मुलगा गेल्याने 1 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी केली. सणसवाडीत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. सणसवाडीतील जनता स्वरक्षणासाठी रस्त्यावर आली होती. ग्रामस्थांनी बाहेरच्या लोकांना सर्वोतपरी सहकार्य केले आहे. विनाकारण कुणावर अन्याय होऊ नये, अशी मागणी अॅड. विजयराज दरेकर यांनी केली. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, कैलास सोनवणे, भगवान शेळके, मोनिका हरगुडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
सामाजिक एकीचे आवाहन
शिक्रापुर । कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभुमीवर सणसवाडीत उसळलेल्या दंगलीत एका स्थानिकाला जीव गमवावा लागला. यात स्थानिक ग्रामस्थांचे मोठे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले. पोलिसांच्या सामाजिक सलोखा जपण्याच्या आवाहनानुसार ग्रामस्थांनी संयमाची भुमिका घेत सामाजिक एकीचे आवाहन केले आहे. मृत राहुल फटांगडे यांच्या नातेवाईकांना 1 कोटी नुकसान भरपाई व त्याच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करावी, स्थानिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊनही स्थानिकांवरच गुन्हे दाखल झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी सणसवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. कोरेगाव भिमा येथील दंगलीच्या पार्श्वभुमीवर सणसवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, अजित दरेकर, आशा दरेकर, बाबासाहेब दरेकर, युवराज दरेकर आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गावाची बदनामी थांबविण्याचे आवाहन
सणसवाडीत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रीत घेऊन सामाजिक सलोखा जपण्याचे काम केले जात असताना गावामध्ये कोणतीही जातीयवादी संघटना कार्यरत नसून दरवर्षी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणार्या बांधवांना ग्रामस्थांनी यापुर्वी अनेक सुविधा पुरविल्या असून यापुढेही त्यांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी देखील दिली. सणसवाडीतील दुर्घटनेत मृत राहुल फटांगडे याला ठार मारणार्यांना तात्काळ अटक करून त्याच्या कुटुंबियांस एक कोटीची भरपाई सरकारने द्यावी, तसेच स्थानिकांच्या मालमत्तेची नुकसान भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी करतानाच गावची विविध चॅनेल वर होत असलेली बदनामी थांबविण्याचे आवाहन यावेळी ग्रामस्थांनी केले. दरम्यान गावातील व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. पोलिस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले व पोलिस निरिक्षक रमेश गलांडे यांनी गावात शांताता व सामाजीक सलोखा जपण्याचे आवाहन यावेळी केले.