गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती
मुंबई :– राज्यात गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉझी स्कीम सूरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोटयावधीची गुंतवणूक करताच ही स्किम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पूणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास सायबर क्राईम मार्फत केला जात असला तरी घोटाळयाची व्याप्ती विचारात घेता हा तपास ईडीकडे देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉझी स्किम सूरू करून अमित भारव्दाज व त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबई, पूणे, नांदेड, कोल्हापूरसह राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची सुमारे २ हजार कोटीपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झाल्या प्रकरणी विधानसभेत अॅड. राहूल कुल, संग्राम थोपटे, शरद सोनवणे आदी सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती.
अनेक ठिकाणी झाले आहेत गुन्हे दाखल
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉझी स्किम सूरू करून अमित एमकुमार भारव्दाज, अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार यांनी नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे फसवणूकीसह ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयामध्ये अमोलकुमार थोंबाळे यास अटक करण्यात आली. उर्वरीत तीन आरोपींचा शोध सूरू आहे. यातील मुख्य आरोपी अमित भारव्दाज हा परदेशात रहात असून त्याच्या विरुध्द लुक आऊट नोटीस काढली जात आहे. तसेच पूणे येथील दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह एमपीआयडी कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात आकाश संचेती यास अटक करण्यात आली आहे.
नोटबंदीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक
देशात नोटबंदी लागू झाल्यानंतर पॉझी स्किममध्ये मोठया प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली. व्याज दर जास्त देण्याचे अमिष दाखवल्यामुळे नागरिक बिटकॉईन स्किम गुंतवणूकीकडे आकर्षित झाले. सिंगापूर येथे बसून अमित भारव्दाज हा नियंत्रण करीत होता. अभासी करंन्सी बाजारात एजंटांनी नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. १० टक्के परतावा देण्याचा करार केला. स्वत:ची करंन्सी निर्माण केली. परंतु या करंन्सीला नगण्य मुल्य प्राप्त झाले. या गुन्हयाचा तपास सर्वत्र सूरू असलातरी सायबर क्राईमसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.
एकूण ३५ सायबर क्राईमची मदत
राज्य सरकार जिल्हयांच्या ठिकाणी असलेल्या एकूण ३५ सायबर क्राईमची मदत घेत आहे.दोघांसाठी अटक वॉरंट काढण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने बीटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीला मान्यता दिलेली नाही. परंतु ही करन्सी चलन हे बेकायदेशीर असल्याचे देखील घोषित केलेले नाही. रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी अशा करन्सीमध्ये गुंतवणूक न करण्यासंबंधी वेळोवेंळी परिपत्रक काढले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ईडीकडे तपास देण्याचा विचार केला जाईल असे रणजित पाटील यांनी सांगितले.