नवी दिल्ली- फिल्पकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान त्यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीने बिन्नी बन्सल आणि संबंधित महिलेचे परस्परसहमतीने प्रेमसंबंध होते असा निष्कर्ष काढला आहे.
बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिल्याने उद्योगजगतात एकच खळबळ उडाली.
वॉलमार्टने फ्लिपकार्टवर नियंत्रण मिळवल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात बिन्नी बन्सल यांना राजीनामा द्यावा लागल्याने उद्योग जगतातून आश्चर्य व्यक्त होत होते. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने जुलैच्या अखेरीस लैंगिक छळाचा आरोप करण्यात आल्याची माहिती दिली. आरोप करणारी महिला फ्लिपकार्टची माजी कर्मचारी होती असे पहिल्या व्यक्तीने सांगितले तर दुसऱ्या व्यक्तीने त्या महिलेने तिथे कधीही काम केलेले नाही अशी माहिती दिली.
बिन्नी यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपास करणाऱ्या समितीला आढळले नाहीत. वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला त्यावेळी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी स्वत:चा पाच टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा सात हजार कोटींना विकला व कंपनीतून बाहेर पडले. पण बिन्नी बिन्नी यांनी स्वत:चा ५.५ टक्के हिस्सा राखून ठेवला होता. सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ साली अवघ्या चार लाख रुपयांच्या भांडवलावर फ्लिपकार्ट कंपनी सुरु केली होती.