पुणे । जुन्नर भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकर्यांमध्ये आजही भितीचे वातावरण आहे. वस्तीत येण्याचे बिबट्यांचे प्रमाणही वाढले आहे. जंगलभागात मानवाचे आतिक्रमण हे या मागील प्रमुख कारण असले तरी बिबट्यांची संख्या वाढली आहे की? हे जाणून घेण्याचीही गरज आहे. पुढील काही वर्षात बिबट्यांची संख्या वाढत गेल्यास त्यांच्या नसबंदीचा विचार करावा लागेल, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी दिली. जागतिक वन्यजीव दिनानिमत्त जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खांडेकर यांनी केंद्राच्या कार्यपद्धतीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभ्यासदौर्यात वाइल्ड लाइफ एसओएस संस्थेचे एसओएसचे डॉ. अजय देशमुख, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वन्यजीव संस्थांकडून प्रस्ताव
मनुष्य आणि बिबटे संघर्ष रोखण्यासाठी आम्ही जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर देतो आहोत. यासाठी आम्ही स्वतंत्र कृती आराखडाही केला असून, लोकसहभागातून केलेली पथकेही गावपातळीवर ही समस्या योग्य पद्धतीने हाताळत आहेत. याच वेळी जुन्नर, शिरूर, खेड आणि तसेच लगतच्या प्रदेशातील बिबट्यांची संख्या जाणून घेण्यासाठी आम्ही बिबट्यांची गणना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव संस्थेसमोर मांडला आहे. गेल्या काही वर्षात बिबट्यांची मोजणीच झाली नसल्याने बिबटे वाढले, कमी झाले की इतरत्र विस्तारले असा निष्कर्ष काढणे अवघड आहे. या गणनेतून आकडे बाहेर आले की पुढील दिशा ठरवणे सोपे होईल. गरज भासल्यास बिबट्यांची नसबंदी करायची का याचा विचार करता येईल. हा विषय संवेदनशील असल्याने विचारपूर्वक मार्ग काढावा लागेल, असे खांडेकर यांनी सांगितले.
वनक्षेत्रात बिबट्यांची सफारी
वन विभागाने 2002 मध्ये बिबट निवारा केंद्र सुरू केले. त्यानंतर दरवर्षी पिंजर्यांची संख्या वाढतच गेली आहे. सध्या या केंद्रामध्ये 31 दिवस-रात्र पिंजरे आणि आठ अचल पिंजरे बांधण्यात आले असून, 24 मादी बिबटे आणि 11 नर बिबटे वास्तव्यास आहेत. यातील काही बिबट्यांना जबर मार लागलेला असल्याने त्यांना पुन्हा निसर्गात सोडता येणार नाही. वस्तीतून पकडलेले सुदृढ बिबटे आम्ही दर काही दिवसांनी पुन्हा निसर्गात सोडत आहोत. तरीदेखील केंद्र अपुरे पडते आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पिंजर्यांची संख्या वाढविण्याबरोबरच केंद्रापासूनच जवळ असलेल्या वनक्षेत्रात बिबट्यांची सफारीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यावर केंद्रावरचा ताण हलका होणार आहे, असे खांडेकर यांनी सांगितले.
माणिकडोह केंद्रामध्ये लवकरच हॉस्पिटल
ऊसकापणी सुरू झाली की शेतामध्ये बिबट्यांची पिल्ले सापडतात. गेल्या वर्षभरात 17 बछड्यांना त्यांच्या आईकडे सोडले आहे, अशी माहिती डॉ. अजय देशमुख यांनी दिली. अपघातादरम्यान जखमी होणारे बिबटे आणि इतर वन्यप्राण्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, त्यांच्यावर उपचार व्हावेत, या उद्देशाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये लवकरच स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. माणिकडोहमधील हॉस्पिटलममध्ये बिबट्यांसह इतर प्राण्यांच्या डीएनए तपासणीपासून ते अद्ययावत शस्त्रक्रियाही करता येणार आहेत.