जाडगाव शिवारातील दर्शनानंतर घबराट कायम
भुसावळ- जाडगाव-मन्यारखेडा या दोन गावाचे अंतर किमान दिड किलोमिटर असून या मार्गावर रविवारी सकाळी वाहनधारक व शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कर्मचार्यांनी या परीसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तालुक्यातील मन्यारखेडा येथील नागरीकांना जाडगाव मार्गे वरणगावातील बाजारपेठ गाठावे लागते. मन्यारखेडा आणि जाडगाव या दोन्ही गावांचे अंतर केवळ दिड किलोमीटर असून हा मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने अनेकांचा वापर याच मार्गाने होतो. याच प्रकारे रविवारी सकाळी मन्यारखेड्यातील काही दुचाकी वाहनधारक जाडगाव मार्गे वरणगावकडे येत असतांना त्यांना बिबट्या आडवा गेला तसेच काही शेतकर्यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडाओरड करून ऐकमेकांना सावध करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने नारायण पाटील यांच्या उसाच्या शेतातून नाल्याकडे पळ काढला. याची माहीती वनविभागाच्या कर्मचार्यांना देण्यात आल्याने तातडीने त्यांनी तातडीने परीसरात धाव घेवून तपास केला असता बिबट्याचे पगमार्क आढळून आले. त्यामुळे त्यांनी नागरीक व शेतकर्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत.
वन विभागाने लक्ष केले केंद्रीत
जाडगाव शिवारात बिबट्या हा अगदी मानवी वसाहतीलगतच आढळून आल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मुक्ताईनगर वनपरीक्षेत्र अधिकारी पी.टी.वराडे यांच्या मार्गदशर्नाखाली वनपाल ललीत गवळी यांनी सहकर्मचार्यांना सोबत घेवून परीसराची पाहणी केली.तसेच बिबट्या या परीसरातून स्थलातंर होत नाही तापर्यंत या भागाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
नागरीकांना सतर्कतेबाबत आवाहन
बिबट्या हा शक्यतो लहान मुलांवर हल्ला करीत असल्याने नागरीकांनी सतर्कता बाळगून लहान मुलांना शक्यतो शेत-शिवाराकडे जावू देवू नये तसेच ऊस व केळी बागांमध्ये जातांना आधी बांधावर थोडा गाजावाजा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच मानवी जिवाला हानी पोहचणार नाही यासाठी वनविभागाकडून दक्षता घेतली जात असल्याचे वन कर्मचार्यांनी सांगीतले.
अतिरीक्त कुमक मागवणार
जाडगाव शिवारात पुन्हा बिबट्या आढळून आल्यास वनविभागाकडून अतिरीक्त कुमक मागवून बिबट्याचा जंगलात हुसकावून लावण्यासाठी अथवा जेरबंद करण्यासाठी अतिरीक्त कुमक मागवली जाणार आहे. तोपर्यंत नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू नये. एखादेवेळेस बिबट्या चवताळून नागरीकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनविभागाने सांगितले.