बिबट्याच्या हल्ल्यातून तीन शेतकरी बचावले

0

साक्री । तालुक्यातील दातर्तीच्या शेंदर शिवारात रविवारी 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास विठ्ठल साळुंखे, त्यांचा मुलगा नरेंद्र साळुंखे व योगेश खैरनार हे तिघे शेतकरी शेतातील काम आटोपून मोटारसायकलने घराकडे परतत असताना लहान बछडा सोबत असलेली बिबट मादीने त्यांचा पाठलाग केला. भयभीत झालेल्या शेतकर्‍यांनी दुचाकीचा वेग वाढवून स्वत:चे प्राण वाचवले. अशी माहीती संदिप सुर्यवंशी या शेतकर्‍याने दिली. मागच्या आठवड्यात याच शिवारात भरदिवसा मेंढपाळ महिलेला बिबटचा दोन-तीन महिने वयाचा बछडा झाडावर बसलेला आढळला होता. त्याच बछड्यासह मादी बिबट या शिवारात वावरत असल्याचे येथील शेतकर्‍रांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना….
बछडा दिसल्याच्या घटनेनंतर पिंपळनेर वनपरिक्षेत्राच्या वनअधिकारी मिनाक्षी जोगदंडे, म्हसदी बिटच्या वनपाल वर्षा चव्हाण व ककाणी, बेहेड व म्हसदीचे वनकर्मचारी यांनी भेट दिली होती. त्यांनी शेतकर्‍यांना व शेतात राहणार्‍या लोकांना सावध राहण्याबद्दल सुचना करून बिबटला दूर ठेवण्याच्या काही टिप्स दिल्या होत्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे कालच्या घटनेवरून सिद्ध झाले. विठ्ठल साळुंखे व त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी शेतातून उशिरा परतणार्‍या शेतकर्‍यांना कॉल करून सदर घटनेची माहीती दिली. व शेतातच सुरक्षित थांबण्याचा सल्ला दिला. या खबरीने धास्तावलेल्या संजय गायकवाड, संदिप सुर्यवंशी व इतर चार पाच शेतकर्‍यांनी गावात फोन लावून 25-30 जणांची मदत मागवून घेतली व ते सुरक्षित रात्री उशिरा घरी पोहोचले. आज बिबटने पाठलाग करण्याच्या घटनेवरून येथील शेतकर्‍यांनी एखाद्या शेतकर्‍याचा जीव गमावण्याआधी परिसरातून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातून केली आहे.