बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

0

चाळीसगाव। गुरांसाठी गवत कापायला आईसोबत गेलेल्या 8 वर्षीय बालकावर अचानक पाठीमागून बिबट्याने आज दुपारी उंबरखेड शिवारातील शेतात हल्ला केल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे वनविभागाला माहिती देऊनही अधिकारी व कर्मचारी उशिरा आल्याने संताप व्यक्त होत होता.

आई, आजोबाही हतबल….
जगमल भुरा चौहान (काठेवाडी) हे गिरणानदी किनारी (उंबरखेड, ता- चाळीसगाव) येथे परिवारासोबत राहतात त्यांचा पशुपालनाचा व दुधाचा व्यवसाय आहे आज त्यांची सुन गुरांचे गवत कापण्यासाठी उंबरखेड शिवारातील शेतात मुलगा राहुल कालु चौहान यास घेऊन गेली होती. इतर महिलांसोबत गवत कापत असतांना राहुल शेजारीच खेळत होता दुपारी शेजारच्या उसाच्या शेतातून पाठीमागून बिबट्याने राहुलवर झडप घालून ओढत नेले आईन हेे बघताच मुलाला पकडले. बिबट्या पुढे तर आई मुलाला मागे ओढत होती त्यावेळी इतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच गायी चारत असलेले मुलाचे आजोबा धावुन आले तेव्हा बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला मात्र बिबट्याचे दात मुलाच्या मानेत घुसल्याने राहुलचा मृत्यू झाला.

अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेची माहिती समजताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाच्या चाळीसगाव येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती दिली ते उशीरा आल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात होता. मुलाचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात नगरसेवक भगवान पाटील, रामचंद्र जाधव व माजी नगरसेवक निलेश (महाराज) राजपुत यांनी मदतकार्य केले.